Ticker

6/recent/ticker-posts

इंग्रजी शाळांना आता झेडपी शाळांचे उत्तर !



मोफत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड; मराठी शाळांकडे वाढता कल

बुध  दि . [ प्रकाश राजेघाटगे ] 

एकेकाळी विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येमुळे अस्तित्वाच्या संकटात सापडलेल्या जिल्हा परिषद शाळा आता नव्या जोमाने उभारी घेत असून खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना कडवी टक्कर देत आहेत. मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, मध्यान्ह भोजन योजना, प्रशिक्षित शिक्षक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर खटाव व माण  तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालकांच्या पसंतीस उतरू लागल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाढती उपस्थिती आणि उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळत आहे. सोमवारी (दि.१५) शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा एकदा शाळांच्या परिसरात घुमू लागला. शासनाच्या विविध योजनांमुळे तसेच शिक्षकांच्या अथक परिश्रमांमुळे जिल्हा परिषद शाळांचे चित्र झपाट्याने बदलत असल्याचे दिसून येत आहे.

संस्कार आणि शिक्षणाची भक्कम पायाभरणी

विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे समर्पित कार्य आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे 'झेडपी शाळा म्हणजे दुय्यम पर्याय' हा समज हळूहळू दूर होत आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून मराठी माध्यमांच्या शाळांना बळकटी देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 'मराठी शाळा वाचल्या पाहिजेत' या उद्देशातून जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, काही खासगी शाळांकडून 'इंटरनॅशनल स्कूलर', 'सीबीएसई पॅटर्न', फाउंडेशन कोर्स', 'स्पर्धा परीक्षा तयारी' आणि 'सेमी इंग्रजी क्लासेस' यांसारख्या आकर्षक संकल्पनांचा वापर करून पालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.

ग्रामीण भागात बदलते चित्र

ग्रामीण भागातील पालकांमध्येही आता महागड्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणापेक्षा दर्जेदार शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे दिसून येत आहे.विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि सामाजिक विकास, मातृभाषेतून होणारी भक्कम पायाभरणी तसेच संस्कारक्षम वातावरण यामुळे जिल्हा परिषद शाळा अधिक प्रभावी ठरत असल्याचे पालकांचे मत आहे.तथापि, काही ठिकाणी शिक्षकांची रिक्त पदे, वेळेवर भरती न होणे आणि विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे शाळा बंद पडण्याच्या समस्या अद्याप कायम आहेत. शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया असतो.

या टप्प्यावर वाचन, लेखन, अंकज्ञान, भाषा कौशल्ये आणि व्यक्तिमत्व विकास यांचा मजबूत पाया घालणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषद शाळा सक्षमपणे कार्य करत असल्याचे चित्र खटाव व माण  तालुक्यात दिसून येत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात गुणवत्तेच्या जोरावर जिल्हा परिषद शाळा पुन्हा एकदा आपले स्थान निर्माण करत असून 'शिक्षणाचा दर्जा महत्त्वाचा की शाळेचा झगमगाट?' या प्रश्नाचे उत्तर पालक स्वतः शोधू लागल्याचे दिसून येत आहे.

झेडपी शाळा गुणवत्तेची हमी

खटाव  व माण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आता केवळ मोफत सुविधांसाठी नव्हे, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची यशस्वी कामगिरी आणि सर्वांगीण विकासासाठी ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. स्कॉलरशिप, नवोदय, एनएमएस अशा विविध स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा तालुक्यातील अवल शाळा ठरल्या आहेत.

झेडपी शाळांकडे पालकांचा वाढता ओढा का?

मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके, मध्यान्ह भोजनाची सुविधा, प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, क्रीडा व सांस्कृतिक विकासाला चालना, मातृभाषेतून भक्कम पायाभरणी, सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास, पालकांवरील आर्थिक भार कमी .