तालुका मराठी पत्रकार संघाचे पोलीस ठाण्यावर धडक; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
पत्रकारांविषयी कथित आक्षेपार्ह व धमकीचे वक्तव्य करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्या निषेधार्थ जाफराबाद तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी जाफराबाद पोलीस ठाण्यावर धडक देत तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच त्यांचा राजीनामा घेण्यासाठी शासनाने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांवरील कोणत्याही प्रकारच्या धमक्या अथवा दडपशाहीचा निषेध करत लोकशाहीमध्ये पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित राहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून समाजहिताचे प्रश्न निर्भीडपणे मांडणे ही त्यांची घटनात्मक जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांविषयी धमकीची भाषा वापरली जाणे अत्यंत गंभीर असून, त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली असून, जाफराबाद तालुका मराठी पत्रकार संघानेही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. संबंधित प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करून कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच पत्रकारांचा अवमान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घालू नये, असेही निवेदनात म्हटले आहे.
पत्रकार संघाच्या वतीने या निवेदनाच्या प्रती राज्याचे गृहमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच तहसीलदार यांनाही पाठविण्यात आल्या. शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मुकेश भारद्वाज, उपाध्यक्ष विष्णू मगर, बाळासाहेब गव्हले, सचिव प्रल्हाद लोणकर, शेख कदीर, शेख अजीम, चेतन बायस, विनोद फादाट, हरी भालके, सलमान पठाण, विशाल वाकडे, संतोष शेळके, मंगलसिंग भारद्वाज यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin