Ticker

6/recent/ticker-posts

उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी



(वाशिम जिल्हा प्रतिनिधी ओंकार पुरी)

रिसोड : स्थानिक उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व सांस्कृतिक समितीच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी होते. त्यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. ते म्हणाले, "आरक्षणाची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे पहिले राजे, शिक्षण सक्तीचे करण्यासाठी मुलांना शाळेत न पाठविणाऱ्या पालकांवर दंडाची तरतूद करणारे दूरदृष्टीचे राज्यकर्ते तसेच कला, संस्कृती, क्रीडा आणि शिक्षणाला राजाश्रय देणारे लोककल्याणकारी राजे म्हणजे राजर्षी शाहू महाराज होत."

प्रा. टिकार यांनी आपल्या भाषणात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रात लोकशाही मूल्यांवर निष्ठा ठेवून परिवर्तन घडवून आणणारे लढाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. डॉ. मंगल खेडेकर यांनी केले. त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड आणि दैववादाला विरोध करून समाजसुधारणेचा नवा आदर्श निर्माण करणारे राजर्षी शाहू महाराज सर्वच क्षेत्रांत प्रेरणादायी ठरले असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुमित लाहोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पांढरे यांनी मानले.

याप्रसंगी प्रा. डॉ. बुधवंत, प्रा. डॉ. वानखेडे, प्रा. डॉ. नंदेश्वर, प्रा. डॉ. मेश्राम, श्री. ओंकार पुरी   यांच्यासह प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. सुनील चरा-टे, श्री. महेश पांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.