अर्धापूर प्रतिनिधी | एस. सावंत
अधिकमासात आलेल्या गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर दाभड येथील जागृत सत्यगणपती मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली. पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अधिकमासात गणेश चतुर्थी आल्याने हा योग 3 वर्षांनी जुळून येतो. त्यामुळे सत्यगणपतीचे दर्शन व पूजा केल्यास अधिक पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिर ट्रस्टच्या वतीने महापूजा, अभिषेक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गर्दीचे नियोजन करण्यासाठी स्वयंसेवक, पोलिस बंदोबस्त तैनात होता. सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत अखंड दर्शन सुरू होते. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातून हजारो भाविक दाखल झाले होते. "अधिकमासातील गणपतीची सेवा म्हणजे 100 पटीने पुण्य," असे जुन्या जाणकार भाविकांनी सांगितले. मंदिर परिसर 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने दुमदुमला होता.





Social Plugin