Ticker

6/recent/ticker-posts

पंचायत समितीच्या प्रकल्प विभागाला आग; कागदपत्रांचे नुकसान, कारण अस्पष्ट



प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे 

नांदगाव खंडेश्वर, प्रतिनिधी : नांदगाव खंडेश्वर येथील पंचायत समिती कार्यालयातील प्रकल्प विभागाला सोमवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून काही काळ नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समितीच्या प्रकल्प विभागातून धूर व आगीच्या ज्वाळा दिसून येताच कर्मचाऱ्यांनी तत्काळ संबंधित यंत्रणांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.

या आगीत विभागातील काही महत्त्वाच्या कागदपत्रांचे व साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र नुकसानीचा नेमका अंदाज अद्याप व्यक्त करण्यात आलेला नाही.

आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणांमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. संबंधित यंत्रणांकडून घटनेची चौकशी सुरू असून आगीमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, घटनेमुळे पंचायत समिती परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.