प्रतिनिधी अनिकेत चांदणे
अकोला, दि. १८ जून : जिल्ह्यातील हॉटेल, पानपट्टी, ढाबा, बार तसेच इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी अन्न सुरक्षा नियम, परवानग्या, गुणवत्ता मानके आणि कायदेशीर जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष कार्यशाळा आयोजित करावी, अशी मागणी शिवसेनेचे संजय सदाशिवराव रोहणकार शिवसेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी उपाध्यक्ष तथा पच्छिम विदर्भ प्रमुख शिव कामगार सेना,सोबत शिवसेना अकोला तालुका प्रमुख विजय वानखडे यांनी सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, अकोला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत विविध हॉटेल, पानपट्टी, ढाबा, बार तसेच किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर तपासणी मोहिमा आणि कारवाई सुरू आहेत. ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी या कारवाया आवश्यक असल्या तरी अनेक लहान व मध्यम व्यावसायिकांना अन्न सुरक्षा कायदा, एफ एस एस ए आय परवाना, नमुना तपासणी प्रक्रिया, गुणवत्ता निकष तसेच विक्रीस पात्र अथवा अपात्र खाद्यपदार्थां विषयी पुरेशी माहिती नसल्याचे वास्तव आहे. बाजारात उपलब्ध असलेली चहापत्ती, बेसन, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थ हे संबंधित उत्पादक कंपन्यांकडून शासनाच्या नियमांनुसार व आवश्यक परवानग्यांच्या आधारे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जातात. मात्र किरकोळ विक्रेत्यांना कोणती काळजी घ्यावी, कोणती कागदपत्रे जतन करावीत आणि कायदेशीर जबाबदाऱ्या कोणत्या आहेत याबाबत स्पष्ट मार्गदर्शन मिळणे गरजेचे असल्याचे संजय रोहणकार यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने सर्व संबंधित व्यावसायिकांची संयुक्त कार्यशाळा आयोजित करून त्यांना “काय करावे आणि काय करू नये” याबाबत सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कार्यशाळेत अन्न सुरक्षा नियम, एफ एस एस ए आय परवाना व नोंदणी प्रक्रिया, स्वच्छता व गुणवत्ता मानके, वापरलेल्या खाद्य तेलाच्या पुनर्वापरा संदर्भातील नियम, बिल व नोंदी ठेवण्याची पद्धत तसेच कायदेशीर जबाबदाऱ्या यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
या उपक्रमामुळे व्यावसायिकांमध्ये अन्न सुरक्षा नियमां विषयी जनजागृती होईल, नियमांचे पालन अधिक प्रभावीपणे होईल आणि अनावश्यक गैरसमज व दंडात्मक कारवाया टाळण्यास मदत मिळेल. यामुळे ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित राहण्याबरोबरच व्यावसायिकांचे आर्थिक नुकसानही टाळता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच अकोला जिल्ह्यात राबविण्यात येणारा हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांतील हॉटेल, ढाबा, पानपट्टी, बार व खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो. अशा कार्यशाळांमधून तयार होणारे मार्गदर्शन साहित्य आणि प्रशिक्षण पद्धती इतर जिल्ह्यांमध्येही राबविल्यास अन्न सुरक्षा नियमांचे पालन अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होईल, असे मत शिवसेनेचे संजय रोहणकार यांनी व्यक्त केले.
अन्न व औषध प्रशासन विभागाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





Social Plugin