पत्रकार : प्रफुल्ल शिरसाठ (अमळनेर)
अमळनेर तालुक्यातील सावखेडे येथील किसान विद्या प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयातील विविध प्रशासकीय व शैक्षणिक अनियमिततांबाबत श्री. अनिल कदम व श्री. लक्ष्मीकांत कदम यांनी शिक्षण विभागाकडे केलेल्या तक्रारीची अखेर गंभीर दखल घेण्यात आली आहे. तक्रारीनंतर उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद जळगाव यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. या चौकशी अहवालाच्या आधारे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी मुख्याध्यापकांना १५ दिवसांच्या आत सर्व त्रुटी दूर करून सविस्तर अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळेत करण्यात आलेल्या अनधिकृत नियुक्तीबाबत शासनाच्या निर्देशांनुसार कारवाई करून संबंधित कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आरटीईच्या निकषांनुसार विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले असून पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर कार्यान्वित करून सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिक्षक भरती ही शासनाच्या पवित्र पोर्टलमार्फतच करण्यात यावी, शाळेतील बंद पडलेले संगणक तात्काळ दुरुस्त करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वापरासाठी उपलब्ध करून द्यावेत तसेच निर्धारित वेळेत संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय मुख्याध्यापकांनी नियमित वर्ग पाहणी करून अध्यापनाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवावे तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध गुणवत्ता विकास उपक्रम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी पालक भेटी आयोजित कराव्यात, शाळेत शंभर टक्के उपस्थिती राखण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत तसेच ग्रामस्थांकडून शाळा प्रशासनाबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी निर्माण होणार नाहीत, यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. शिपाई भरतीही शासनाच्या विद्यमान नियमावलीनुसारच करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षण विभागाने या सर्व बाबींची पूर्तता करून १५ दिवसांच्या आत सविस्तर अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, आदेशाची अंमलबजावणी कशी होते याकडे आता पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.





Social Plugin