Ticker

6/recent/ticker-posts

दौंड तालुक्यात L.C. व बोर्ड सर्टिफिकेटसाठी बेकायदेशीर शुल्क वसुली; ग्राहक पंचायतीची शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार



पाटस प्रतिनिधीःगणेश गावडे 

दौंड:दौंड तालुक्यातील खाजगी व अनुदानित शाळा- महाविद्यालयांकडून इयत्ता १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (L.C.) व बोर्ड सर्टिफिकेट (मार्कलिस्ट) देताना १०० ते ५०० रुपयांपर्यंत बेकायदेशीर शुल्क आकारले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या संदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायत, दौंड शहराचे अध्यक्ष श्री. गणेश मनोहर जगताप यांनी शिक्षण उपसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे विभाग) यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, या ईमेलची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली आहे. तालुक्यातील मेरी मेमोरियल स्कूलने अशा प्रकारे दाखल्यासाठी बेकायदेशीर शंभर रुपये शुल्क घेतल्याचा ठोस पुरावाच तक्रारीसोबत जोडण्यात आला आहे. सदरची वसुली ही शासन निर्णय दिनांक ०४ जानेवारी २०१६ व शिक्षण संचालनालयाच्या परिपत्रक क्रमांक २९७७, दिनांक ०५ जून २०२५ चे उघड उल्लंघन असून, या शासकीय आदेशानुसार विद्यार्थ्यांना L.C. व मार्कलिस्ट पूर्णतः मोफत देणे बंधनकारक आहे. या लूटमारीविरोधात ग्राहक पंचायतने शिक्षण विभागाकडे ठोस मागण्या केल्या असून, यामध्ये दौंड तालुक्यासाठी तात्काळ स्वतंत्र परिपत्रक काढून दाखले मोफत देण्याचे निर्देश द्यावेत, मागील ३ वर्षांत विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे घेतलेले सर्व शुल्क ७ दिवसांत व्याजासह परत करावे, तसेच नियमबाह्य वसुली करणाऱ्या दोषी शाळांवर ८ दिवसांत शिस्तभंगाची कारवाई करून अहवाल सादर करावा अशा मागण्यांचा समावेश आहे. यासोबतच प्रत्येक शाळा-महाविद्यालयात "L.C. व मार्कलिस्ट मोफत आहे" असा जनजागृती फलक लावणे बंधनकारक करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात शिक्षण विभागाने तात्काळ दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई न केल्यास, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने माननीय लोकायुक्त व माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष श्री. गणेश मनोहर जगताप यांनी दिला आहे