टिटवाळा | प्रफुल्ल शेवाळे :--
टिटवाळा परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि परवडणारे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने श्री. विजय (भाऊ) मारुती देशेकर यांच्या पुढाकारातून सरकारी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी विशेष जनआंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत परिसरातील प्रत्येक पालकांकडून हमीपत्र (Consent Letter) संकलित करण्यात येणार आहे. या हमीपत्रात, सरकारी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाल्यास आपल्या पाल्याला त्या शाळेत प्रवेश देण्याची तयारी पालक लेखी स्वरूपात दर्शवतील. यामुळे शासनाला संभाव्य विद्यार्थीसंख्येचा ठोस अंदाज मिळून शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव अधिक भक्कम होणार आहे.
या मोहिमेचे उद्दिष्ट किमान 2,000 पालकांची हमीपत्रे शासनाकडे सादर करण्याचे असून, त्यामुळे पटसंख्येचा प्रश्नही सुटण्यास मदत होईल.
श्री. विजय (भाऊ) देशेकर यांनी सांगितले की, "खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे अनेक पालकांवर दरवर्षी मोठा आर्थिक भार पडतो. सरकारी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाल्यास पालकांचे हजारो रुपये वाचतील आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची समान संधी मिळेल. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे; तो व्यवसाय होऊ नये."
अलीकडेच गणवेश सक्ती व शैक्षणिक शुल्कासंदर्भातील पालकांच्या विविध प्रश्नांमुळे शिक्षण व्यवस्थेवर चर्चा सुरू असताना, टिटवाळ्यातील हा उपक्रम अनेक पालकांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पालकांनी 7208136411 या क्रमांकावर WhatsApp द्वारे आपले पूर्ण नाव व विद्यार्थ्याची सध्याची इयत्ता पाठवावी. त्यानंतर हमीपत्राचा नमुना पाठविण्यात येईल.
या उपक्रमाला जास्तीत जास्त पालकांनी पाठिंबा देऊन ही माहिती इतर पालकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. टिटवाळा परिसरात असणाऱ्या अनेक शाळा शालेय साहित्य बाहेरून विकत न घेता फक्त त्याच शाळेतून घ्यावे अशी सक्ती करीत असतात, आणि याचा नाहक भुदंड पालकांना बसत असतो. यावर वारंवार तक्रार करून सुद्धा कल्याण डोंबिवली महापालिकेचे शिक्षण खातं अशा शाळांवर कारवाई करीत नसल्याचे विजय देशेकर यांनी म्हटलं आहे.





Social Plugin