Ticker

6/recent/ticker-posts

#### *वाशीमच्या वृद्ध कलावंतांचे 2019 ते 2023 चे मानधन रखडले*



*श्री सरस्वती देवी संस्थानचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी*

*वाशीम, 13 जुलै*प्रतिनिधी संजय भरदुक: कलेची आयुष्यभर सेवा करणाऱ्या वयोवृद्ध कलावंतांना सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाकडून दिले जाणारे मानधन गेल्या 5 वर्षांपासून रखडले आहे. यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत *श्री सरस्वती देवी संस्थान, कोळी ता. कारंजा जि. वाशीम* यांनी जिल्हाधिकारी वाशीम यांना निवेदन देऊन 2019 ते 2023 या कालावधीतील प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढून मानधन मंजूर करण्याची मागणी केली आहे.

संस्थेच्या निवेदनानुसार, 2014 ते 2018 या कालावधीपर्यंत वृद्ध कलावंत मानधनाचे प्रस्ताव वेळेवर मंजूर होऊन मदत मिळत होती. 2023 पर्यंत वृद्ध कलावंत मानधन निवड समिती कार्यरत होती. 2024 पासून निमशासकीय समिती स्थापन झाली असून त्या समितीने 2024 आणि 2025 चे प्रस्ताव मंजूर केले आहेत. परंतु 2019 ते 2023 या दरम्यानचे प्रस्ताव मात्र अद्यापही प्रलंबित आहेत.

वयोवृद्ध कलावंतांना सन्मानाचे जीवन जगण्यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा नाईलाजास्तव सर्व वयोवृद्ध कलावंतांना लोकशाही मार्गाने आंदोलन किंवा आमरण उपोषण करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी श्रीकृष्ण नेमाणे,लक्ष्मण इंगळे, संजय भरदुक, वनिता धनवे, उज्वला कव्हर,मंगला ठाक, सविता बोळे,मंदा नेमाणे, संतोष धनवे, रामदास शेजव, सुरेश करपे,विनोद वानखडे, कमलाकर कोकरे, दिलीप बिहाडे इतर असंख्य कलावंत हजर होते.

हे निवेदन जिल्हाधिकारी वाशीम यांना देण्यात आले असून तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.वाशिम.आणि समाज कल्याण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.तसेच त्याची प्रत मा. सामाजिक न्यायमंत्री, मा. पालकमंत्री वाशीम, मा. कला व सांस्कृतिक मंत्री, यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.