

प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे
अमरावती, दि. 16 : वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, 24 जुलै 2026 पासून शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, ग्रामीण, शहरी व इतर सर्व रस्त्यांवर दुचाकी चालकासह मागे बसणाऱ्या प्रवाशासाठी आयएसआय (ISI) मार्कचे प्रमाणित हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
"सुरक्षित प्रवास – सुरक्षित परिवार; हेल्मेटचा वापर प्रत्येकवेळी अपरिहार्य!"
पोलीस प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये 454, 2025 मध्ये 417, तर 1 जानेवारी ते 30 जून 2026 या कालावधीत 210 रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. एकूण प्राणघातक अपघातांपैकी सुमारे 60 टक्के अपघात दुचाकी वाहनांशी संबंधित असून, हेल्मेट न वापरल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.
"हेल्मेट ही सवय नव्हे, तर जीवनाची हमी आहे."
मोटार वाहन अधिनियम 1988 (सुधारित अधिनियम 2019) च्या कलम 129 नुसार चालक व मागील प्रवाशासाठी हेल्मेट वापरणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे 24 जुलैपासून अमरावती शहर वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, हेल्मेटशिवाय आढळणाऱ्या चालक व प्रवाशांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा वाहनचालक परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो.
"दंड टाळण्यासाठी नव्हे, जीव वाचवण्यासाठी हेल्मेट घाला."
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, हेल्मेट हे केवळ दंडापासून बचाव करण्याचे साधन नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेचे संरक्षण कवच आहे. प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने हेल्मेटचा वापर करून सुरक्षित वाहतुकीस सहकार्य करावे.




Social Plugin