जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णीच्या जनतेचा संतप्त सवाल!
टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
"आले किती, गेले किती... सत्ताधाऱ्यांची बोलण्याची किमयाच न्यारी, आश्वासनाची नुसती लागलीया भारी!" हीच आज जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यात येणाऱ्या टेंभुर्णी गावाची खरी शोकांतिका बनली आहे. महाराष्ट्रात एकीकडे विकासाच्या मोठ्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे मात्र टेंभुर्णी येथील हजारो प्रवाशांच्या नशिबी केवळ 'नावालाच बस स्टँड' उरले आहे. येथील मुख्य बस स्थानक म्हणजे केवळ एक 'भुलभुलय्या' बनले असून, प्रत्यक्षात प्रवाशांना तासन्तास महामार्गावरून उन्हा-पावसात एसटीची वाट पाहत उभे राहावे लागत आहे.
या गंभीर समस्येकडे थेट जालना जिल्ह्यातील खासदार व आमदार आणि परिवहन प्रशासनाचे लक्ष घालून प्रवाशांची हेळसांड थांबवावी अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
नेत्यांची आश्वासने हवेत; प्रत्यक्षात मात्र रस्त्यावर उभे राहण्याची वेळ!
टेंभुर्णी हे जाफ्राबाद तालुक्यातील एक महत्त्वाचे आणि मोठ्या लोकसंख्येचे गाव असून, तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथून रोज शेकडो विद्यार्थी, नोकरदार, महिला आणि वृद्ध रुग्ण प्रवासासाठी बाहेर पडतात. परंतु गावातील बस स्टँडची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, 'बस स्टँड कधी कोणाला दिसतच नाही' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रवाशांसाठी शेड नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, की बस गाड्या थांबण्यासाठी योग्य जागा नाही.
निवडणुका आल्या की सर्वच पक्षांचे पुढारी येतात, मतांचा जोगवा मागतात आणि "लवकरच भव्य बस स्थानक उभारू" असे आश्वासन देऊन निघून जातात. मात्र, सत्ता हाती आल्यावर या नेत्यांची 'बोलण्याची किमया' संपते आणि आश्वासनांची नुसतीच खैरात उरते. आजपर्यंत अनेक सत्ताधारी आले आणि गेले, पण टेंभुर्णीकरांचे हाल संपलेले नाहीत.
"जिथे पैसा, तिथेच दुनियादारी?" अशी म्हणण्याची टेंभुर्णीकरावर आली आहे.
अहो जिथे पैसा आहे, तिथे सगळी दुनियादारी!" अशी संतप्त भावना आता गावातील सुजाण नागरिक आणि तरुणांमधून व्यक्त होत आहे. सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय स्वार्थ साधणाऱ्या पुढार्यांविषयी आता मतदारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे हे राजकारण आता थांबले पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे.
पुढारी आणि सत्ताधारी नेत्यांनी जर आमच्या गावाला हक्काचे, सर्व सोयीसुविधांनी युक्त असे बस स्टँड दिले नाही, तर आगामी काळात मतदार आपली ताकद दाखवून सत्ताधाऱ्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत, असा थेट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
प्रतिक्रिया
टेंभुर्णी येथे तात्काळ सुसज्ज आणि आधुनिक बस स्थानकाची उभारणी करण्यात यावी.
प्रवाशांना बसण्यासाठी शेड, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय करून,
महामार्गावर प्रवाशांना जीव मुठीत धरून उभे राहावे लागू नये, यासाठी सुरक्षित थांबा निर्माण करावा - मुनाफ भाई.





Social Plugin