Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईच्या पाणीपुरवठ्याची चिंता मिटली; भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडले, 3,064 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू



-- *प्रफुल्ल शेवाळे भातसानगर | दि. 25 जुलै 2026*

मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे *भातसा धरण* मुसळधार पावसामुळे वेगाने भरत असून, शनिवारी (दि. 25 जुलै) दुपारी धरणाचे *पाच दरवाजे प्रत्येकी 25 सेंटीमीटरने उघडण्यात आले.* त्यानंतर धरणातून *3,064 क्यूसेक्स* पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्याची चिंता जवळपास संपुष्टात आली असून, धरण ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली आहे.

जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, शनिवारी सकाळी धरणाची *पाणीपातळी 137.38 मीटर* इतकी नोंदविण्यात आली. धरणातील उपयुक्त *पाणीसाठा 817.881 दशलक्ष घनमीटर* असून तो *86 टक्क्यांहून अधिक* झाला आहे. धरण परिसरात सकाळी 8 वाजेपर्यंत *159.00 मिमी* पावसाची नोंद झाली असून, चालू पावसाळ्यातील *एकूण पर्जन्यमान 1,872* मिमीवर पोहोचले आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक कायम आहे.

दरम्यान, *शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती कल्याण समितीचे (राज्यमंत्री दर्जा) अध्यक्ष दौलत दरोडा* यांच्या हस्ते भातसा धरणाचे विधिवत जलपूजन करण्यात आले. यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी *श्री. भालेराव, गणेश कचरे, समीर तडवी* यांच्यासह विभागातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी *विशाल डिंगोरे, प्रतीक गायकवाड* आणि पत्रकार आणि धरण क्षेत्रात नियमित पणे काम करणारे ठेकेदार मंडळी सुद्धा उपस्थित होती.

भातसा धरणाची *पूर्ण जलसाठा पातळी 142.07 मीटर* असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात धरणातून विसर्गात वाढ होऊ शकते. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहून *प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.*

मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशाला सर्वाधिक पाणीपुरवठा करणारे भातसा धरण समाधानकारक पातळीवर पोहोचल्याने यंदाच्या पावसाळ्यात *पाणीटंचाईची चिंता पूर्णपणे दूर झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.*