Ticker

6/recent/ticker-posts

अमळनेर हादरले चोपडा रोडवरील पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

अमळनेर शहरावर मंगळवारी दुपारी दुःखाचा डोंगर कोसळला. चोपडा रोडवरील उड्डाण पुलाजवळ पावसाच्या पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सिंधी कॉलनी परिसरातील तीन अल्पवयीन मित्र उड्डाण पुलाजवळील पाण्याने भरलेल्या खड्ड्याजवळ पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तिघांना पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत मुलांची ओळख व घटनेचे नेमके कारण याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत पावसाळ्यात पाण्याने भरलेले खोल खड्डे, तलाव आणि इतर धोकादायक ठिकाणे सुरक्षित करण्याची मागणी केली आहे. अशा ठिकाणी संरक्षण भिंती, इशारा फलक आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

तीन निरागस जीवांचा असा दुर्दैवी अंत संपूर्ण अमळनेरसाठी मोठा धक्का आहे.