Ticker

6/recent/ticker-posts

अमळनेरातील खदाणीत तीन बालकांचा दुर्दैवी बुडून मृत्यू; सेल्फी काढताना घडली हृदयद्रावक घटना



प्रफुल्ल शिरसाठ (अमळनेर प्रतिनिधी)

अमळनेर शहरातील चोपडा रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळील खदाणीत मंगळवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सेल्फी काढत असताना एका मुलाचा पाय घसरला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात इतर दोघेही खोल पाण्यात गेले आणि तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण अमळनेर शहरावर शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये मानव बंटी रतनानी (वय १४), कार्तिक विकी उधवानी (वय १४) आणि दिनेश विजय पंजवानी (वय १७) यांचा समावेश असून तिघेही सिंधी कॉलनी, अमळनेर येथील रहिवासी होते. प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता तिघे खदाणीत गेले होते. खदाणीतील बेटासारख्या उंचवट्यावर जात असताना सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात एका मुलाचा तोल गेला. त्याला वाचविण्यासाठी इतर दोघांनी हात दिला, मात्र पाण्याची खोली सुमारे ३० फूट असल्याने तिघेही पाण्यात बुडाले.

ही घटना एका रिक्षाचालकाच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने मदतीसाठी धावपळ सुरू झाली. ११२ क्रमांकावर माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार सी. यू. पाटील, शहर तलाठी अशपाक पिंजारी, पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. देवळी येथील दीपक मोरे यांनी धाडसाने पाण्यात उडी मारून तिन्ही मुलांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले.

दिनेश पंजवानी हा प्रताप महाविद्यालयात इयत्ता अकरावी (कॉमर्स) मध्ये शिक्षण घेत होता आणि अर्धवेळ कामही करत होता. मानव रतनानी व कार्तिक उधवानी हे पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होते. तिघांच्या अकाली निधनामुळे सिंधी कॉलनीसह संपूर्ण अमळनेरमध्ये हळहळ व्यक्त होत असून नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी नागरिकांना, विशेषतः लहान मुलांनी आणि पोहता न येणाऱ्या व्यक्तींनी पावसाळ्यात भरलेल्या खदाणी, तलाव व धोकादायक जलाशयांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.