दखल न घेतल्यास 'मनसे स्टाईल' आंदोलनाचा इशारा
खुलताबाद, प्रतिनिधी : अभिषेक ठेंगडे
खुलताबाद तालुक्यातील मौजे ममनापूर फाटा ते दलित वस्ती दरम्यानचा रस्ता अतिक्रमणमुक्त करून नागरिकांसाठी तातडीने मोकळा करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी (दि. १७) तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
हे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष राजू पाटील घोरपडे यांच्या हस्ते सादर करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार सावंत यांनी निवेदन स्वीकारले.
ममनापूर फाटा ते दलित वस्ती हा रस्ता अतिक्रमणामुळे अरुंद झाला असून परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना ये-जा करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोकादायक बनत असून अपघाताची शक्यता वाढली आहे.
याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मार्गावरील अतिक्रमणे हटवून रस्ता पूर्णपणे मोकळा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील घोरपडे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, "या निवेदनाची तातडीने दखल घेऊन रस्ता मोकळा करण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या खास 'मनसे स्टाईल'ने तीव्र आंदोलन छेडेल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील."
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin