Ticker

6/recent/ticker-posts

दौंड बाजार समितीला १ रुपयात जमीन देण्याचा शासनाचा ऐतिहासिक निर्णय!





आ. राहुल कुल यांच्यासह दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागणीला यश
पाटस येथील १० एकर जागा देण्यास महसूल विभागाची मंजुरी

पाटस प्रतिनिधीःगणेश गावडे

दौंडःदौंड तालुक्यातील शेतकरी आणि व्यापारी वर्गासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. मौजे पाटस येथील तब्बल ४ हेक्टर म्हणजेच सुमारे १० एकर शासकीय गायरान जमीन दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीला नवीन बाजार आवार (मार्केट यार्ड) उभारण्यासाठी हस्तांतरित करण्यास राज्य शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सार्वजनिक प्रयोजनासाठी अवघ्या १ रुपयाच्या नाममात्र दराने ही मौल्यवान जागा बाजार समितीला देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन आदेश जारी केला आहे.

या मंजूर जागेच्या तपशिलानुसार, पाटस (ता. दौंड, जि. पुणे) येथील गट क्रमांक ८९० मधील ०४ हेक्टर ०० आर. इतकी गायरान जमीन बाजार समितीच्या ताब्यात दिली जाणार आहे. पुणे विभागीय आयुक्तांनी शासनाला या जागेसंदर्भात एक सकारात्मक अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या अनुषंगाने आणि दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव व संचालक मंडळाने केलेल्या सातत्यपूर्ण मागणी आणि विनंतीचा विचार करून शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.

पाटस हे दौंड तालुक्यातील एक अत्यंत महत्त्वाचे, रहदारीचे आणि मध्यवर्ती ठिकाण मानले जाते. या ठिकाणी सुसज्ज आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त असे नवीन मार्केट यार्ड उभे राहिल्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना आपला शेतीमाल, फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी हक्काची आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा लांब अंतरावर जाण्याचा वाहतुकीचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचणार असून, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर व्यापार वाढीस चालना मिळणार आहे.

राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी मोहसिन रा. शेख यांनी या शासन निर्णयावर स्वाक्षरी केली असून, या आदेशाची प्रत पुढील तातडीच्या कार्यवाहीसाठी पुणे जिल्हाधिकारी, पणन संचालक आणि दौंड बाजार समितीच्या सचिवांना पाठवण्यात आली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पाटस येथील नवीन बाजार आवाराचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, लवकरच या जागेवर भव्य मार्केट यार्डचे काम प्रत्यक्ष सुरू होईल अशी आशा संपूर्ण तालुक्यातून व्यक्त केली जात आहे.