Ticker

6/recent/ticker-posts

*पुसेगावात ६ महिन्यांपासून हैदोस घालणारी 'वायर कटर' गँग गजाआड; सातारा एलसीबी अन् पुसेगाव पोलिसांची संयुक्त 'सर्जिकल स्ट्राईक'!

 



११ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; ५ मोठे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश

बुध  दि [ प्रकाश राजेघाटगे ] 

महावितरणच्या (एमएसईबी) इलेक्ट्रिक पोलवरील अल्युमिनियमच्या तारांची चोरी करून गेल्या ६ महिन्यांपासून पुसेगाव परिसर आणि खटाव तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत 'वायर कटर' गँगचा सातारा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व पुसेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अखेर 'गेम ओव्हर' केला आहे. अत्यंत धाडसी व तांत्रिक कौशल्याचा वापर करून पोलिसांनी केलेल्या या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये टोळीतील ४ अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आरोपींकडून तब्बल ११,४३,६००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, यामुळे पुसेगाव पोलीस ठाण्यातील ५ गंभीर गुन्ह्यांची एकाच वेळी उकल झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महावितरणच्या जिवंत वीज वाहक तारा कापून चोरून नेण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते आणि परिसरात भीतीचे वातावरण होते. या घटनांची गांभीर्याने दखल घेत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके व पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांना अज्ञात चोरांचा छडा लावण्याचे तात्काळ आदेश दिले होते.

पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण आणि खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे खटाव तालुक्यातील आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी सापळा रचून *१) सुरेश बबन जाधव (वय २३), २) दत्तात्रय ऊर्फ राघू किरण मदने (वय २६), ३) आनंदराव ऊर्फ संजय उमाजी मदने, आणि ४) बापूराव ऊर्फ बापू धोंडीराम मदने (वय ३३)* (सर्व रा. बुध .ता. खटाव, जि. सातारा) यांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत ५ वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून बाजारभावाप्रमाणे *५,४३,६००/- रुपये किमतीच्या एकूण १२०८ किलो ग्रॅम वजनाच्या अल्युमिनियमच्या तारा* आणि गुन्ह्यात चोरीसाठी वापरलेली *६,००,०००/- रुपये किमतीची 'महिंद्रा मॅक्स पिकअप' जीप (क्र. MH-16-AY-9665)* असा एकूण *११,४३,६००/- रुपयांचा मुद्देमाल* हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) सह भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आसदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पुसेगावचे सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक पारितोष दातीर तसेच एलसीबी व पुसेगाव पोलीस ठाण्याचे अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, अमित झेंडे, प्रवीण फडतरे, अविनाश चव्हाण, सुजित भोसले, अमित सपकाळ, अरुण पाटील, स्वप्नील शिंदे, किरण जगताप, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, पृथ्वी जाधव, रोहित निकम, विशाल पवार, सचिन ससाणे, महेश निर्मळ, इरफान मुलानी आणि पुसेगावचे योगेश बागल, तात्यासाहेब ढोले, अशोक सरक, यशोदा मोरे, राहुल जाधव, उमेश देशमुख, अविनाश घाडगे, अक्षय जायकर, दऱ्याबा नरळे, व चालक तुषार बाबर यांनी केली आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि महावितरणने सुटकेचा श्वास सोडला असून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.