विलास पाटील भडगाव प्रतिनिधी भडगाव दि. 22 जुलै 2026 :
पाचोरा वनक्षेत्रातील भडगाव परिमंडळ अंतर्गत नियत क्षेत्र आमडदे येथील मौजे भटगाव शिवारात एका मादी बिबटाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी राजेंद्र रामदास पाटील यांच्या शेतालगत बांबरूड–भटगाव रस्त्याच्या कडेला हा मृत बिबट आढळून आला. संबंधित बिबट हा मादी असून अंदाजे दोन वर्षांचा असल्याची प्राथमिक माहिती वन विभागाने दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पशुधन विकास अधिकारी, भडगाव यांच्या पथकाकडून मृत बिबटाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ न शकल्याने पुढील तपासासाठी व्हिसेरा नमुने घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
ही संपूर्ण कार्यवाही अमोल पाटील (सहाय्यक वनसंरक्षक, जळगाव), राजेश ठोंबरे (मानद वन्यजीव रक्षक, जळगाव) यांच्या उपस्थितीत सरिता पाटील (वनपरिक्षेत्र अधिकारी, पाचोरा) यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने केली.वन विभागाकडून बिबटाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असून, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.





Social Plugin