Ticker

6/recent/ticker-posts

'वाढदिवस विकास पुरुषाचा... संकल्प प्लास्टिक निर्मूलनाचा'






* दिग्रसमध्ये ६१,२४२ रुपयांच्या बक्षिसांसह पर्यावरणाची लोकचळवळ
मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम
* शहरासह ग्रामीण भागात प्लास्टिकमुक्तीची हाक

राजपाल बनसोड  प्रतिनिधी | दिग्रस

 दिग्रस : महाराष्ट्राचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्रसमध्ये यंदा केवळ शुभेच्छांचा वर्षाव न करता पर्यावरण रक्षणाचा संकल्प प्रत्यक्ष कृतीतून साकारला जाणार आहे. 'वाढदिवस विकास पुरुषाचा... संकल्प प्लास्टिक निर्मूलनाचा' या घोषवाक्याखाली दिग्रस शहर व तालुक्यात भव्य प्लास्टिक निर्मूलन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, शहर व ग्रामीण विभागातील विजेत्यांसाठी एकूण ६१ हजार २४२ रुपयांची रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

   शिवसेना दिग्रस तालुका व शहर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी बहुउद्देशीय संस्था, स्व. भानुदास शिंदे फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत मांडवा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध जनजागृती करत दिग्रस प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार या स्पर्धेतून व्यक्त करण्यात आला आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरण, जलस्रोत, शेती आणि मुक्या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. रस्ते, नाले आणि सार्वजनिक ठिकाणी साचणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन परिसरातील प्लास्टिक गोळा करावे आणि पर्यावरण संरक्षणात आपला सहभाग नोंदवावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

  स्पर्धा ३० जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत होणार असून, जमा केलेल्या प्लास्टिकचे वजन रविवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून स्व. शेखर पाटील महिंद्रे जिनिंग, गजानन टॉकीजजवळ, दिग्रस येथे करण्यात येईल. त्यानंतर दुपारी २ वाजता विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे. शहर आणि ग्रामीण विभागासाठी स्वतंत्र बक्षीस योजना जाहीर करण्यात आली असून प्रथम ७,००१, द्वितीय ६,००१, तृतीय ५,००१, चतुर्थ ४,००१, पाचवे ३,००१, सहावे २,००१, सातवे १,१११, आठवे १,००१, नववे ७०१, दहावे ५०१ आणि अकरावे ३०१ रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

 या स्पर्धेत विद्यार्थी, युवक-युवती, महिला बचत गट, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, केमिस्ट असोसिएशन, कृषी केंद्रे तसेच वैयक्तिक आणि सामूहिक स्वरूपात सर्व नागरिकांना सहभागी होता येणार आहे. "माझे गाव, माझी ओळख - प्लास्टिकमुक्त दिग्रस" हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी नवा आदर्श ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. दिग्रसमध्ये सामाजिक जबाबदारी, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारी ही स्पर्धा आता लोकसहभागातून मोठी जनचळवळ ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- चौकट -

    या स्पर्धेत तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, तहसील, पंचायत समिती, शिक्षण विभाग, वन विभाग, सहकारी संस्था, नगरपालिका, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. या स्पर्धेमुळे शहर व ग्रामीण भाग स्वच्छ, सुंदर होण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळेल.

 उत्तम ठवकर, तालुका प्रमुख शिवसेना

चौकट 

  ही स्पर्धा केवळ स्पर्धा न राहता लोकचळवळ बनली पाहिजे. प्रत्येक घरातून प्लास्टिक गोळा करून नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे. प्लास्टिकमुक्त समाज घडविण्यासाठी सामूहिक सहभाग हाच प्रभावी मार्ग आहे. तेव्हा या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे

- यादव गावंडे, जिल्हाध्यक्ष ग्राम संवाद सरपंच संघटना







 














 








 




 











-