एकल व विधवा महिलांच्या सन्मानासाठी वटपौर्णिमेला अनोखी 'विधवा मुक्ती' चळवळ
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
भारतीय संस्कृती आणि परंपरेचा मानला जाणारा वटपौर्णिमेचा सण यंदा खटाव तालुक्यातील पांगरखेल गावामध्ये एका क्रांतीची नवी पहाट घेऊन आला. पांगरखेल ग्रामपंचायत आणि जयहिंद फाउंडेशन खटाव तालुका टीम यांच्या अध्यक्षा सौ हेमलता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पवित्र सणाचे औचित्य साधून केवळ सणच साजरा झाला नाही, तर शतकानुशतके चालत आलेल्या अनिष्ट रूढी-परंपरांना छेद देत 'पांगरखेल गाव विधवा मुक्त' करण्यात आले.
एरवी वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला वडाची पूजा करतात, मात्र समाजातील एका घटकाला म्हणजेच पतीचे छत्र हरवलेल्या एकल व विधवा महिलांना-या आनंदापासून वंचित ठेवले जाते. हाच सामाजिक भेद मिटवण्यासाठी जयहिंद फाउंडेशनने एक कौतुकास्पद आणि भावनिक पुढाकार घेतला. गावातील सर्व महिला आणि विधवा भगिनींना एकत्र आणून समाजातील हा दुजाभाव कायमचा संपवण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जयहिंद फाउंडेशनच्या खटाव तालुका अध्यक्षा सौ. हेमलता फडतरे यांनी उपस्थित महिलांना विधवा मुक्तीचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले. पांगरखेल गाव विधवा मुक्त करण्याबाबत त्यांनी महिलांचे मत अजमावले असता, उपस्थित सर्व महिलांनी शंभर टक्के हात उंचावून या क्रांतीला उत्स्फूर्त संमती दिली. यानंतर अध्यक्षा हेमलता फडतरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पांगरखेल गावात तीन वेळा 'विधवा मुक्तीचा' जयघोष करण्यात आला. उपस्थित महिलांच्या आवाजाने संपूर्ण
परिसर दुमदुमून गेला. मॅडमनी सर्वांना विधवा मुक्तीची शपथ दिली, ज्यामध्ये *" आम्ही आजपासून गावातील सधवा-विधवा असा कोणताही भेद करणार नाही आणि सर्वांना समान मानाचे स्थान देऊ, "* असा दृढ संकल्प एकमुखाने करण्यात आला. टाळ्यांच्या कडकडाटात या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत झाले.
या भावनिक प्रसंगी जयहिंद फाउंडेशनच्या सचिव सौ. पूनम साळुंखे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. या क्रांतीचे सर्वात हृदयस्पर्शी दृश्य त्यानंतर पाहायला मिळाले. गावातील सर्व विधवा माता-भगिनींचे सन्मानाने औक्षण करण्यात आले, त्यांना हळदी-कुंकू लावून, साखर चारून आणि पारंपरिक पद्धतीने खणा-नारळासह आंब्याने त्यांची खणती (ओटी) भरण्यात आली. समाजाने वर्षानुवर्षे ज्या महिलांना अशा मंगल कार्यापासून दूर ठेवले, आज त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून मानाचे स्थान दिले जात असताना उपस्थित सर्वच विधवा भगिनींना आपले अश्रू अनावर झाले. डोळ्यांत आनंदाश्रू आणि चेहऱ्यावर कृतज्ञतेचा भाव लपवूनही राहत नव्हता. कित्येक वर्षांचा एकाकीपणा आणि उपेक्षा संपल्याची ती भावना अत्यंत भावनिक होती.
या ऐतिहासिक निर्णयाचे गावच्या सरपंच सौ. अलका जगताप, उपसरपंच श्री. महेंद्र जगताप, तसेच माजी सरपंच व सेवानिवृत्त हवलदार प्रल्हादराव जगताप यांनी आनंदाने स्वागत केले आणि जयहिंद फाउंडेशनचे आभार मानले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मीनाक्षी कुमठेकर आणि हर्षदा जगताप यांनी केले. या प्रसंगी अंगणवाडी सेविका सौ. नंदिनी जगताप, आशा सेविका सौ. वैशाली जगताप आणि ग्रामपंचायत सदस्य सौ. संगीता जगताप उपस्थित होत्या.
या मंगल दिनाचे स्मरण म्हणून जयहिंद फाउंडेशनच्या वतीने गावात दोन वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या संपूर्ण मोहिमेत फाउंडेशनच्या खटाव टीममधून अध्यक्षा सौ. हेमलता फडतरे, उपाध्यक्षा सौ. संगीता मामी, सचिव सौ. पूनम साळुंखे, वीर पत्नी सोनाली बोडरे, सदस्य श्री. चंद्रकांत इंगळे आणि सौ. शोभा वसव यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. पांगरखेल ग्रामपंचायत आणि समस्त गावकऱ्यांनी जयहिंद फाउंडेशनच्या या पुरोगामी आणि संवेदनशील कार्याचे तोंडभरून कौतुक केले. पांगरखेलने घेतलेला हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल, यात शंका नाही.





Social Plugin