Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय कर्मचारी एकता संघाच्या माध्यमातून टीमा इंडिया लिमिटेडमध्ये तीन वर्षांचा भरघोस पगारवाढ करार



पालघर प्रतिनिधी : धनेश क्षिरसागर 

अखिल भारतीय कर्मचारी एकता संघाच्या माध्यमातून टीमा इंडिया लिमिटेड, अच्छाड, ता. तलासरी, जि. पालघर येथील कामगारांसाठी सन 2025 ते 2028 या कालावधीसाठी तीन वर्षांचा भरघोस पगारवाढ करार यशस्वीरित्या करण्यात आला. या करारामुळे कंपनीतील कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या आर्थिक हिताला मोठा दिलासा मिळाला आहे.

या पगारवाढ करारावर दि. 03 जुलै 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. कंपनी व्यवस्थापन आणि अखिल भारतीय कर्मचारी एकता संघाच्या प्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चेनंतर हा करार अंतिम करण्यात आला.

करारावर युनियनचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ॲड. निलेश मोरे, सचिव मा. सागर तांबोळी, पालघर जिल्हाध्यक्ष मा. अतिश चौधरी, तसेच टीमा इंडिया लिमिटेड कार्यकारी समितीचे अध्यक्ष मा. रमण वाघात, युनियन कमिटीचे पदाधिकारी आणि कंपनी व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करून कामगारांच्या हिताचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण करण्यात आला.

या करारामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह विविध सेवा अटींमध्ये लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील परस्पर विश्वास, संवाद आणि सहकार्यामुळे हा करार यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून भविष्यातही औद्योगिक शांतता व उत्पादनवाढीस चालना मिळेल, असा विश्वास युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

पगारवाढ करार यशस्वी झाल्याबद्दल कंपनीतील कामगारांनी तसेच युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.