पाटस प्रतिनिधीःगणेश गावडे
दौंड:पुणे जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर आज दौंड तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. या ढगफुटीसदृश पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित
आज सकाळपासूनच सुरू झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील अनेक मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर विजेचे खांब कोसळले आहेत. यामुळे अनेक गावे अंधारात बुडाली असून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान महावितरणच्या कर्मचाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. सुदैवाने खांब पडले तेव्हा नागरिक आजूबाजूला नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यांवर झाडे
पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, तालुक्यातील प्रमुख मार्गांवर तसेच गावांमधील रस्त्यांवर जुनी आणि मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. झाडे पडल्यामुळे काही ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने रस्ते मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांनी आधीच जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. दौंडमधील सद्यस्थिती पाहता, प्रशासनाने नागरिकांना अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.





Social Plugin