सोनपेठ प्रतिनिधी( शिवशंकर तुपकर) दि. 03/06/20260:-
सोनपेठ नगर परिषद प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) निधीतील तब्बल २ कोटी ५८ लाख रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परभणी जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात अर्थपूर्ण चर्चा रंगलेली दिसून येत आहे.
या प्रकरणी मुंबई येथील म्हाडाचे अधिकारी महेश विष्णू चव्हाण (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी नुसार, सोनपेठ नगर परिषद हद्दीतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुलासाठी केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर झालेला निधी नियमांनुसार थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे बंधनकारक होते.
महाराष्ट्र राज्याची स्टेट नोडल एजन्सी (SNA) म्हणून कार्यरत असलेल्या म्हाडा मार्फत १० जानेवारी २०१९ ते ८ जून २०२२ या कालावधीत २ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी सोनपेठ नगर परिषदेला वितरित करण्यात आला होता. मात्र, तपासात संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यांऐवजी नगर परिषदेच्या बँक
ऑफ महाराष्ट्र व स्टेट बँक ऑफ इंडिया या खात्यातून इतर व्यक्तींच्या बँक खात्यांमध्ये हा निधी वर्ग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा अपहार करून पात्र लाभार्थ्यांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या तक्रारीच्या आधारे सोनपेठ पोलीस ठाण्यात तत्कालीन मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध सरकारी नोकराने केलेला विश्वासघात, फसवणूक तसेच संगनमताने गुन्हा केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.तपासा अंती मोठे मासे लागणार गळाला अशी दबक्या आवाजात चर्चा जोरात सुरू आहे.





Social Plugin