Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगाव पोलिसांकडून तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश; ७ जणांना अटक, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त



बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ] 

पोलीस असल्याचे भासवून रस्त्यावरील वाहने अडवून जबरदस्तीने खंडणी उकळणाऱ्या सात तोतया पोलिसांच्या टोळीला पुसेगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन चारचाकी गाड्या, ८ मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण २१ लाख १९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी रात्री २३.४५ वाजेच्या सुमारास, वर्धनगड (ता. खटाव) गावच्या हद्दीत पुसेगाव ते सातारा जाणारे रोडवर असलेल्या नायरा पेट्रोल पंपाजवळ काही लोक खाकी आणि खाजगी गणवेशात लोखंडी बॅरिगेटिंग लावून येण्या-जाणाऱ्या गाड्या अडवून पैसे घेत असल्याची माहिती पुसेगाव पोलीस स्टेशनचे सपोनि. नागनाथ खुणे यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली.

माहिती मिळताच सपोनि. खुणे यांनी आपल्या टीमसह तत्काळ घटनास्थळी जाऊन खात्री केली. तिथे त्यांना सात लोक (४ पुरुष आणि ३ महिला) लोखंडी बॅरिगेटिंग लावून थांबलेले दिसले. त्यांच्याजवळ सफारी आणि स्विफ्ट डिझायर या दोन गाड्या देखील उभ्या होत्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ते तोतया पोलीस असल्याचे उघड झाले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

१. विकास दत्तात्रय शिंदे (वय २४, रा. सांगली) - खाकी कपड्यात

२. वैभव पांडुरंग पवार (वय ३३, रा. सांगली) - खाकी पॅन्ट आणि ब्राऊन शूजमध्ये

३. राहुल सुनील पाटील (वय २८, रा. सांगली) - खाजगी गणवेशात

४. केतन बाबासाहेब महाजन (वय ३३, रा. सांगली) - खाजगी गणवेशात

५. प्रियांका रणदिप नाईक (वय ३२, रा. कोल्हापूर) - खाकी पॅन्टमध्ये

६. प्रियांका संजय भोरे (वय ३५, रा. सांगली) - खाकी शर्ट, पॅन्ट आणि महाराष्ट्र पोलीसचा लोगो असलेली टोपी

७. अरुणा दयानंद आवळे (वय ४१, रा. सांगली) - खाजगी गणवेशात

या टोळीने वर्धनगड आणि ललगुण येथील दोघांना अडवून, 'आम्ही पोलीस आहोत, तुम्ही रात्रीचे का फिरताय? तुमच्यावर कारवाई करतो. कारवाई नको असेल तर ५०० रुपये द्या' असे म्हणून भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी आरोपींकडून सफारी कार (MH 12 MF 3832), स्विफ्ट डिझायर कार (MH 10 CA 4937), ८ अँड्रॉइड मोबाईल आणि २२०० रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. आरोपींना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री तरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि. नागनाथ खुणे, पोलीस हवालदार योगेश बागल, रेश्मा भोसले, अशोक सरक, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, उमेश देशमुख, दऱ्याबा नरळे, चालक तुषार बाबर यांच्या टीमने केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.