Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा नं युती धर्माला हरताळ फासला*





*पत्रकार परिषदेत शिवसेनेचा चा आरोप

 स्वप्नील घोटेकार 

ग्रामीण प्रतिनिधी गुजरी 

भाजपा नं युती धर्माला हरताळ फासला असा आरोप शिवसेनेच्या वतीने नगर पंचायत राळेगांव मध्ये आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे..

प्रत्येक बाबतीत अडवणूक, दिशाभूल करणारी माहिती पसरविण्याचे काम भाजपा ची मंडळी करत असल्याचे सांगितले आहे..

*राळेगावच्या पाणीप्रश्नावर भाजपचे 'गढूळ जलाभिषेक आंदोलन' म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असून राळेगाव शहरातील पाणीप्रश्नावरून शिवसेनेच्या मित्रपक्षाकडून म्हणजेच भाजपकडून नगरपंचायतीवर करण्यात येत असलेले तथाकथित 'गढूळ जलाभिषेक आंदोलन' हे जनतेच्या प्रश्नांबद्दलची खरी तळमळ नसून आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केलेला राजकीय स्टंट आहे. राळेगावच्या नागरिकांना गढूळ पाणी मिळण्यास आणि अमृत २.० पाणीपुरवठा योजनेला विलंब होण्यामागे नेमके कोण जबाबदार आहे, याचा आज  खुलासा केला आहे..

राळेगाव शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती म्हणून मी, नगरपंचायत पदाधिकाऱ्यांसह तत्कालीन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री. ना. संजय राठोड यांची भेट घेतली. त्यांच्या माध्यमातून आम्हाला 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  भेट घेण्याची संधी मिळाली. त्यांनी तत्परता दाखवत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या आणि राळेगाव शहरासाठी ४७ कोटी ६७ लाख रुपयांची ऐतिहासिक अमृत २.० नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली.

या योजनेच्या शासन निर्णयात (GR) कार्यान्वयन यंत्रणा म्हणून नगरपंचायत, राळेगाव स्पष्ट नमूद करण्यात आली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया सुरू झाली, टेंडर प्रसिद्ध झाले आणि पुढील टप्प्याची प्रक्रिया सुरू असतानाच अचानक शासनाकडून कार्यान्वयन यंत्रणा बदलून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) करण्यात आल्याचे पत्र प्राप्त झाले.

या बदलामागील कारणांची शहानिशा केली असता, विद्यमान आमदारांनी वरिष्ठ स्तरावर दबाव आणून नगरपंचायती कडील अधिकार काढून घेऊन ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग केल्याचे निदर्शनास आले. लोककल्याणकारी योजनेतच लोकप्रतिनिधीने अडथळा निर्माण करणे हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे.

राळेगावची जनता सुज्ञ आहे. यवतमाळ शहराचे उदाहरण सर्वांसमोर आहे. तेथे जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेली पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. वारंवार पाईपलाईन फुटणे, मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होणे आणि रस्त्यांचे नुकसान होणे, ही परिस्थिती सर्वश्रुत आहे.

याउलट, बाभूळगाव येथे नगरपंचायतीमार्फत योजना वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली आणि नागरिकांना पाणीपुरवठाही सुरू झाला. मग राळेगावमध्ये नगरपंचायतीकडून काम काढून घेऊन ते जीवन प्राधिकरणाकडे का सोपवण्यात आले? योजना रखडावी, रस्त्यांचे नुकसान व्हावे आणि नगरपंचायतीचे श्रेय हिरावून घ्यावे, हा त्यामागील हेतू होता का?

आज नगरपंचायतीवर आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी आधी आपल्या आमदारांना प्रश्न विचारायला हवेत..

काम आम्ही मंजूर करून आणले, निधी आम्ही मिळवून दिला; मात्र श्रेय लाटण्यासाठी आणि कामात अडथळे निर्माण करण्यासाठी कार्यान्वयन यंत्रणा बदलण्यात आली. आजचे आंदोलन हे स्वतःचे अपयश आणि पाप लपवण्याचा केवळ एक राजकीय फार्स आहे.

राळेगावच्या नागरिकांचे, विशेषतः सुशिक्षित बेरोजगार युवकांचे लक्ष मूलभूत प्रश्नांपासून विचलित करून नगरपंचायतीची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र राळेगावची जागरूक जनता हे सत्य ओळखते.

आमचा राळेगावच्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर शेवटपर्यंत लढा देत ही योजना नगरपंचायतीमार्फतच दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक राळेगावकराला शुद्ध पाणी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत अशी पत्रकार परिषदेत दिली आहे..

यावेळी नगराध्यक्ष रविंद्र शेराम, उपाध्यक्ष जानराव गीरी सह सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते..