Ticker

6/recent/ticker-posts

स्मार्ट मीटर सक्ती थांबवा; नांदगावात माकपचे आंदोलन



नांदगाव खंडेश्वर, प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे 

 दि. २९ जून : महावितरणकडून वीज ग्राहकांना जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत मोबाईल संदेश पाठवून सक्ती केली जात असल्याचा आरोप करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने सोमवारी नांदगाव खंडेश्वर येथील महावितरण कार्यालयासमोर प्रतिकात्मक पोस्टर जाळून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.


यावेळी माकपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया ग्राहकांची स्पष्ट संमती न घेता राबविण्यात येत असून ती लोकशाही मूल्ये व वीज ग्राहकांच्या हक्कांच्या विरोधात आहे. स्मार्ट प्रीपेड मीटरला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातून विरोध होत असून, शासनाने बळजबरीची भूमिका घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली.


आंदोलनादरम्यान माकपने आरोप केला की, विदर्भात मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होत असतानाही येथील नागरिकांनाच महागडी वीज घ्यावी लागत आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून भविष्यात वीज वितरणाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न होत असून त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली.


यावेळी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, केंद्र सरकारची १७ ऑगस्ट २०२१ ची अधिसूचना ही केवळ मार्गदर्शक स्वरूपाची असून स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती करण्याचा अधिकार त्यातून मिळत नाही. तसेच ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नये, असा न्यायालयाचा आदेश असल्याचा दावाही करण्यात आला.


स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज बिलात वाढ होण्याची शक्यता, रिचार्ज संपल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर अतिरिक्त भार पडू शकतो, अशी चिंता माकपने व्यक्त केली. वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने ग्राहकांना संपूर्ण माहिती, पर्याय आणि स्पष्ट संमती न घेता कोणतीही नवीन व्यवस्था लागू करू नये, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.


यावेळी माकपचे तालुका सचिव कॉ. श्याम शिंदे यांनी शासनाने स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी, अशी मागणी केली. शहर सचिव कॉ. मोहसिन शेख यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक आंदोलनात सहभागी झाले.