महाराष्ट्र ग्रामीण न्यूज | प्रतिनिधी : विजय अधिकार, जव्हार
जव्हार तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती जव्हारचे गटविकास अधिकारी श्री. अक्षय पगार यांनी दरडग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसेच संबंधित विभागांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
या पाहणीदरम्यान शिरोशी, गोरठण, कासटवाडी, आकरे, कुतुरविहीर, कोतीमाळ, दसकोड, कळकीविहीर आणि कोगदा येथील दरडग्रस्त भाग, रस्ते खचलेली ठिकाणे, घरांची पडझड, पडलेली झाडे तसेच इतर आपदग्रस्त क्षेत्रांची पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेत प्रशासनाकडून त्वरित मदत उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या.
पाहणीदरम्यान श्री. अक्षय पगार यांनी शेतात उतरून शेतकऱ्यांसमवेत भातलावणीच्या कामातही सहभाग घेतला. त्यांच्या या अनपेक्षित सहभागामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सुशिक्षित युवकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांच्या कृतीतून मिळाल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.
तालुक्यात अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने दरड कोसळणे, रस्ते खचणे, झाडे पडणे तसेच नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. पूरग्रस्त पाण्यात जाणे, मासेमारी करणे किंवा खेकडे पकडण्यासाठी जीव धोक्यात घालू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
आपत्तीच्या कोणत्याही परिस्थितीत प्रशासन नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून आवश्यक ती सर्व मदत तत्काळ उपलब्ध करून दिली जाईल, असा विश्वास गटविकास अधिकारी श्री. अक्षय पगार यांनी व्यक्त केला.





Social Plugin