विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान; यशवंत सेना व जय मल्हार शैक्षणिक संस्थेचा उपक्रम
टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
यशवंत सेना, अहिल्यानगर आणि जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने धनगर समाजाचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात पार पडला. समाजातील एकजुटीचा संदेश या मेळाव्यातून देण्यात आला. पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या या मेळाव्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श राज्यकारभार, न्यायप्रियता, लोककल्याणकारी धोरणे आणि समाजसेवेच्या कार्याचा जागर करून उपस्थितांना प्रेरित करण्यात आले.
शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य तुळशिराम भोजने होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र बिडगर, शर्मिला नलावडे, यशवंत सेनेचे शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, भीमराव जाधव, मुख्याध्यापक अशोक सूर्यवंशी, पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त रेश्मा पुणेकर, विठ्ठल दातीर, पोपट मतकर, अनिल भदर्गे (जालना), ज्ञानेश्वर कांबळे, अजय जाडकर, सुनिता आदमाने यांच्यासह धनगर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, उद्योजक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्कारप्राप्तांचा विविध क्षेत्रातील कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.
प्रास्ताविकात मेळाव्याचे संयोजक तथा यशवंत सेनेचे शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर म्हणाले की, धनगर समाज हा परंपरेने कष्टकरी, स्वाभिमानी आणि राष्ट्रनिष्ठ समाज आहे. मात्र आजच्या स्पर्धेच्या युगात समाजाने शिक्षण, उद्योग, प्रशासन आणि आधुनिक तंत्रज्ञान या क्षेत्रांत अधिक सक्षमपणे पुढे जाण्याची गरज आहे. समाजातील मतभेद विसरून एकत्र येणे, युवकांना दिशा देणे आणि गुणवंतांचा सन्मान करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आदर्शातून समाजात सेवा, समर्पण आणि नेतृत्वाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हा मेळावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य तुळशिराम भोजने म्हणाले की, समाजाच्या विकासाचा पाया हा शिक्षणात आहे. समाजातील प्रत्येक मुलगा आणि मुलगी उच्च शिक्षित झाली, तर समाजाची प्रगती आपोआप होईल. धनगर समाजाने शिक्षण, संघटन आणि सामाजिक बांधिलकी या तीन सूत्रांवर पुढे वाटचाल केली तर समाजाची प्रगती निश्चित होईल. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार करताना शिक्षण, न्याय, धर्मनिरपेक्षता, स्त्री सक्षमीकरण आणि लोककल्याण यांचा आदर्श घालून दिला. त्यांच्या कार्याचा अभ्यास करून आजच्या पिढीने समाजसेवेची प्रेरणा घ्यावी. समाजातील गुणवंतांचा सन्मान हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो आणि त्यातून नवे नेतृत्व घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्यात इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ यांनी “लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य, राज्यकारभार आणि सामाजिक योगदान” या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. त्यांनी अहिल्यादेवींनी उभारलेली मंदिरे, घाट, धर्मशाळा, न्यायव्यवस्था, लोकाभिमुख प्रशासन आणि स्त्री नेतृत्वाचा आदर्श यावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. त्यांच्या विचारांचे आजच्या समाजजीवनातही मोठे महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत द्रविड यांनी केले, तर ज्येष्ठ समाजसेवक विठ्ठल दातीर यांनी उपस्थितांचे आभार मानले. मेळाव्याला धनगर समाजातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.





Social Plugin