Ticker

6/recent/ticker-posts

वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना छत्री वाटप; युवा नेतृत्वाची सामाजिक बांधिलकी



प्रफुल्ल शिरसाठ (अमळनेर प्रतिनिधी) सावखेडा, ९ जुलै २०२६

सामाजिक कार्यातून जनतेशी घट्ट नाळ जोडणारे युवा कार्यकर्ते श्री. पुष्कराज भरतराव कदम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद केंद्र शाळा, सावखेडा येथे विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना होणारा त्रास लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना छत्र्यांसह गोडधोडाचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक, ग्रामस्थ तसेच परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी श्री. पुष्कराज भरतराव कदम यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना श्री. पुष्कराज कदम म्हणाले की, राजकारण हे केवळ निवडणुकांपुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे हीच खरी लोकसेवा आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, युवकांच्या प्रगतीसाठी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही विविध लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सावखेडा परिसरात श्री. पुष्कराज भरतराव कदम यांच्या कार्याची नागरिकांकडून सर्वत्र प्रशंसा होत आहे. वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याच्या त्यांच्या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.