पळसवाडी : प्रतिनिधी अभिषेक ठेंगडे
पंचायत समितीच्या सदस्या योगिता नारायण बर्डे यांनी गल्लेबोरगाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला भेट देऊन शाळेच्या शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या शिक्षणाबाबत, शाळेतील सुविधा तसेच अडचणी जाणून घेतल्या.
भेटीदरम्यान योगिता बर्डे यांनी विविध वर्गांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. नियमित अभ्यास, शिस्त, वाचनाची सवय आणि स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून सातत्याने परिश्रम करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
त्यानंतर त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांशी चर्चा करून शाळेतील शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेतला. शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत तसेच विविध विषयांच्या अध्यापनात येणाऱ्या अडचणींबाबत माहिती घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शाळेतील स्वच्छता, परिसराची देखभाल आणि विद्यार्थ्यांमधील शिस्त याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या विकासासाठी आवश्यक बाबींची नोंद घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान कृषी अधिकारी पंचायत समिती खुलताबाद हनमंत बोयनार तसेच भाजपचे कार्यकर्ते नारायण बर्डे हेही उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले व शाळेच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.
या प्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.





Social Plugin