आसिफ शेख @तालुका प्रतिनिधी
भूम : भेसळीविरोधात सुरू असलेल्या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने भूम शहरात धडक कारवाई करत विनापरवाना साठवून ठेवलेली तब्बल १,१२५ किलो दूध पावडर जप्त केली. ही कारवाई रविवारी (दि. ५) दुपारी करण्यात आली असून या कारवाईत ६१ बॅगमधील सुमारे २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अन्न सुरक्षा विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, भूम शहरातील बाळासाहेब घोडके यांच्याकडे ही दूध पावडर विनापरवाना साठवून ठेवण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून हा साठा जप्त केला. या कारवाईची माहिती समोर येताच संपूर्ण भूम तालुक्यात एकच खळबळ उडाली. भूम तालुका हा दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध असून, येथील खवा, पेढा व अन्य दुग्धजन्य पदार्थांची विक्री राज्यासह देशातील विविध भागांत केली जाते. अनेक धार्मिक स्थळांवरही भूम तालुक्यातील खवा व पेढ्याला मोठी मागणी आहे. मात्र, या व्यवसायात भेसळीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक वर्षांपासून होत होत्या. दुधामध्ये कृत्रिमरीत्या गुणवत्ता वाढविण्यासाठी किंवा उत्पादनाचे प्रमाण वाढविण्यासाठी दूध पावडरचा वापर केला जात असल्याच्या चर्चामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. अशा भेसळीमुळे लहान नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर भेसळखोरांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेचा भाग म्हणून भूम येथील ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या धडक कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. भूम तालुक्यातील दुग्ध व्यवसायाची प्रतिमा जपण्यासाठी आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे





Social Plugin