महाराष्ट्र ग्रामीण न्युज -
प्रतिनिधी : विजय अधिकार | जव्हार
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या वतीने रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी जव्हार शहरात श्री जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
रथयात्रेची सुरुवात राजे यशवंतराव मुकणे यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. त्यानंतर रथयात्रा राममंदिर, पाचबत्ती, मोर्चा मार्गे लेझीमच्या गजरात, हरिनाम संकीर्तन आणि जयघोषात प्रगती प्रतिष्ठान येथे पोहोचली. मार्गातील विविध ठिकाणी भाविकांनी श्री जगन्नाथांचे औक्षण करून दर्शनाचा लाभ घेतला.
पावसाची रिपरिप सुरू असतानाही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. महिला, पुरुष, युवक व लहान मुलांनी मोठ्या संख्येने रथयात्रेत सहभागी होऊन भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला.
प्रगती प्रतिष्ठान येथे हरिनाम संकीर्तन, श्री जगन्नाथ कथा, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसेच जव्हारमधील विद्यार्थ्यांनी आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या भव्य रथयात्रेमुळे संपूर्ण जव्हार शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. इस्कॉनच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.





Social Plugin