Ticker

6/recent/ticker-posts

लाईट ऑफ लाईफ ट्रस्टतर्फे बदनापूर येथे १०३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप




कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी 

जालना : लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या वतीने शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी बदनापूर सेंटरअंतर्गत १०३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम रावसाहेब दानवे पाटील डी. फार्मसी कॉलेज, बदनापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे आयोजन लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या जालना विभागाचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी श्री. जोमा मस्ती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावसाहेब दानवे पाटील डी. फार्मसी कॉलेजचे विभागप्रमुख प्रा. शंकर खंदारे हे होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. जी. डोईफोडे (मुख्याध्यापक, साई हायस्कूल, अकोला-बदनापूर), मा. श्री. पी. आर. उगळमुळे  (मुख्याध्यापक, शांतिदेवी शिर्के प्राथमिक शाळा, बदनापूर) तसेच उद्योजक श्री. अर्जुन दाभाडे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले.

या शैक्षणिक वर्षात ट्रस्टच्या माध्यमातून १०३ विद्यार्थ्यांना शालेय बॅग, रजिस्टर, कंपास बॉक्स, चित्रकला वही, आलेख पुस्तक तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी, "शिक्षण हेच यशाचे खरे साधन आहे. संस्थेकडून मिळणाऱ्या मदतीचा योग्य उपयोग करून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या पायावर उभे राहून समाजात आदर्श स्थान निर्माण करावे," असे प्रतिपादन केले.

लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही संस्था २००८ पासून जालना जिल्ह्यातील मंठा, वाटूर, जालना, बदनापूर आणि भाटेपुरी या भागांत विविध सामाजिक व शैक्षणिक प्रकल्प राबवत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्यविकास आणि शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक मदत, व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम आणि विविध प्रशिक्षण कार्यक्रमही संस्थेमार्फत राबविले जातात. संस्थेच्या संस्थापिका डॉ. विल्ली डॉक्टर आहेत.

या कार्यक्रमास लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आनंदो प्लस प्रकल्पाचे प्रतिनिधी, एसएफएसईपी प्रकल्पाचे जालना विभाग समन्वयक सुबोध खंदारे, केंद्र कार्यकारी कैलास कोल्हे, शिवाजी काजळकर तसेच सोनाली कोरडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाचे स्वागत व कौतुक केले.