Ticker

6/recent/ticker-posts

वर्धनगड-नेर फाटा नजीक आयशर ट्रक आणि कारची भीषण धडक; पुसेगाव येथील दांपत्य ठार, मुलगा गंभीर जखमी



​ बुध दि [प्रकाश राजेघाटगे ] 

सातारा-पंढरपूर महामार्गावर कोरेगाव-पुसेगाव दरम्यान नेर फाट्या जवळ (श्रीनिधी पेट्रोल पंपा नजीक) २७ जुलै रोजी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास आयशर ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे वरिष्ठ लिपिक विजय बबनराव भोसले (वय सुमारे ५०) व त्यांच्या पत्नी सौ. समृद्धी विजय भोसले (वय सुमारे ४५) या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा वरद विजय भोसले हा गंभीर जखमी झाला आहे.

​पुसेगाव पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक (क्र. MH-25-AJ-9334) चे चालक समिर बाबु नदाफ (रा. तुगाव, ता. उमरगा, जि. धाराशिव) हे सातारा बाजूकडे जात असताना, कोरेगाव बाजूकडून येणारी मारुती सुझुकी फ्रॉन्स कार (क्र. MH-11-DN-3580) मधील चालक विजय भोसले यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, अविचाराने वाहन राँग साईडला (गलत दिशेने) आणून ट्रकला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारच्या पुढील भागाचा पार चक्काचूर झाला.

​घटनेची माहिती मिळताच पुसेगाव पोलीस ठाण्याचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विजय भोसले व समृद्धी भोसले यांना मृत घोषित केले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलगा वरद याच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचार सुरू आहेत.

​या प्रकरणी आयशर चालक समिर नदाफ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुसेगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा (रजि. नं. १७२/२०२६) दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(A), १२५(B), ३२४(४) व मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.

​पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार वाघमारे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास महिला पोलीस हवालदार कोळेकर करत आहेत. श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मचारी भोसले दांपत्याच्या अशा अचानक जाण्याने पुसेगाव परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.