Ticker

6/recent/ticker-posts

दिग्रस स्टेट बँकसमोरील जलवाहिनी फुटली रस्त्याच्या कामाला पुन्हा ब्रेक!



सिमेंट रस्त्याच्या खोदकामात पाईपलाईनचे नुकसान


राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

    दिग्रस शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील शेगाव - माहूर सिमेंट रस्त्याच्या कामादरम्यान पुन्हा एकदा जलवाहिनी फुटल्याने रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियासमोरील मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, गेल्या दोन दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

      राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान जेसीबीचा फटका जलवाहिनीला बसल्याने ही पाईपलाईन फुटल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी परिसरात पाणी साचले असून, रस्त्याचे कामही ठप्प झाले आहे. आधीच संथ गतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला आता जलवाहिनी फुटीमुळे आणखी विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज नगरपालिकेचे कर्मचारी जलवाहिनी दुरुस्तीसाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र, संबंधित लाईनमधून पाणीपुरवठा सुरू असल्याने दुरुस्ती करताना अडचणी निर्माण झाल्या. पाणी बंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पाईपमध्ये काडी टाकून तात्पुरता प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला. पाणी पूर्णपणे बंद झाल्यानंतरच दुरुस्तीचे काम करता येणार असल्याने काही काळ काम ठप्प ठेवावे लागले. दरम्यान, रस्त्याच्या कामादरम्यान वारंवार जलवाहिनी फुटत असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि नगरपालिकेमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रत्येक वेळी पाईप फुटल्यानंतर पाणी वाया जाते, नागरिकांना गैरसोय सहन करावी लागते आणि रस्त्याच्या कामालाही विलंब होतो.

    यासंदर्भात नगरपालिकेच्या नळयोजना कंत्राटदाराने सांगितले की, जलवाहिनी दुरुस्तीचा प्रत्यक्ष खर्च मोठा असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केवळ २०० रुपयांची भरपाई दिली जाते. प्रत्यक्षात साहित्य, मनुष्यबळ आणि दुरुस्तीचा खर्च त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याने नगरपालिकेवर आर्थिक ताण पडत असल्याची बाब त्यांनी मांडली. शहरातील महत्त्वाच्या मार्गावरील सिमेंट रस्त्याचे काम आणि पाणीपुरवठा व्यवस्था या दोन्ही अत्यावश्यक सेवा असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि नगरपालिकेने परस्पर समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे. जलवाहिनी फुटल्यानंतर तातडीने दुरुस्ती करून पाणी वाया जाणे थांबविणे आणि रस्त्याचे कामही विनाविलंब सुरू ठेवणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.


   वारंवार होणाऱ्या जलवाहिनी फुटीमुळे एकीकडे अमूल्य पाणी वाया जात आहे, तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याच्या कामालाही अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे यापुढे अशा घटना टाळण्यासाठी काम सुरू करण्यापूर्वी भूमिगत जलवाहिन्यांचे अचूक सर्वेक्षण करून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.