Ticker

6/recent/ticker-posts

विजेच्या तारा तुटून दोन निष्पाप खिलार बैलांचा दुर्दैवी मृत्यू



प्रतिनिधी पळसवाडी ( अभिषेक ठेंगडे )

खुलताबाद :खुलताबाद तालुक्यातील घोडेगाव येथे मंगळवारी (दि. ३० जून २०२६) दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विजेच्या तारा तुटून प्रवाह सुरू असल्याने शॉक लागून शेतकऱ्याच्या दोन खिलार जातीच्या बैलांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारभारी विश्वनाथ पाटील जाधव हे आपल्या स्वमालकीच्या दोन खिलार बैलांच्या साहाय्याने शेतातून जनावरांसाठी चारा घेऊन घरी परतत होते. दरम्यान, दुपारी सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर अचानक तुटून पडलेल्या वीजवाहक तारांचा संपर्क बैलांशी आला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला.

या वेळी प्रसंगावधान राखत कारभारी जाधव यांनी बैलगाडीवरून तात्काळ उडी घेत स्वतःचा जीव वाचवला. अन्यथा ही दुर्घटना अधिक भीषण ठरली असती.

घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच दादासाहेब जाधव यांच्यासह पांडुरंग जाधव, गणेश घोडके, प्रवीण जाधव, जनार्दन चव्हाण, पंकज जाधव, रामहरी जाधव, रामेश्वर जाधव, गुलाब ठेंगडे, आप्पासाहेब जाधव तसेच गावातील अनेक नागरिक व तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर महावितरण कंपनीचे अभियंते, महसूल विभागाचे बंडू आव्हाड तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत बैलांचे शवविच्छेदन करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली.

या दुर्घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शासन व संबंधित विभागाने तातडीने नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विजेच्या तारा तुटून अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी महावितरणने जीर्ण व धोकादायक वीजवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशीही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.