झरी जामणी: जिल्हा परिषद शाळा पाटण येथील उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या एकत्रिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणाची अखेर प्रशासनाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर यशस्वी सांगता झाली. माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या पुढाकाराने तसेच गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या मध्यस्थीमुळे उपोषणकर्ते व प्रशासन यांच्यात तोडगा निघाला.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २० मे रोजी दिलेल्या अधिकृत आदेशानुसार पाटण येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांचे एकत्रिकरण करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, संबंधित विभागाकडून आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते राम आईटवार यांच्या नेतृत्वाखाली ५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते.
या उपोषणाला गावातील नागरिक, पालक, युवक तसेच विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. उपोषणस्थळी अनेकांनी भेट देऊन स्वाक्षरी अभियानाद्वारे आपले समर्थन व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी सुरूझालेल्या या आंदोलनाची दखल घेत माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधत संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा घडवून आणली. यानंतर बीडीओ व गटशिक्षणाधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शाळा एकत्रिकरणाबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने आणि विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचे स्पष्ट केल्याने उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.
यावेळी माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, बीडीओ, गटशिक्षणाधिकारी तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत राम आईटवार यांना ज्यूस पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी दिनेश जयस्वाल, पुनाजित कुडमेथे, गोविंद यण्णावार, लेतु टेकाम, शेख बाबू, विद्यानंद एस. अहिरे, नागोराव मुल्लेवार, मोहन आरके, भवानी भिमा टेकाम, किशोर गणपतराव राऊत, भास्कर मडावी, मुनवर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.





Social Plugin