Ticker

6/recent/ticker-posts

भव्य संत नागेबाबा, संत सावता महाराज ,संत नामदेव महाराज पुण्यतिथी सोहळा



संतोष फुलारी @भेंडा प्रतिनिधी (ता. नेवासा)दि:7 ऑगस्ट 2026 -

श्री क्षेत्र भेंडा बुद्रुक येथील श्री संत नागेबाबा मंदिरात मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी 'श्री संत नागेबाबा चरित्रकथा' या ग्रंथाच्या प्रकाशनाचा भव्य सोहळा संत-महंतांच्या साक्षीने संपन्न होणार आहे. संत नागेबाबा, संत शिरोमणी सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संत नागेबाबांच्या जीवनकार्याचा, अध्यात्मिक विचारांचा व समाजप्रबोधनातील योगदानाचा सविस्तर आढावा या ग्रंथामध्ये मांडण्यात आला आहे. प्रसिद्ध लेखक डॉ. वसू भारद्वाज यांनी हा ग्रंथ लिहिला असून, ग्रंथनिर्मितीसाठी संत नागेबाबा परिवाराने आर्थिक सहकार्य केले आहे.

या प्रकाशन सोहळ्यास गुरुवर्य भास्करगिरी महाराज प्रमुख उपस्थित राहणार असून, गुरुवर्य मिराबाई महाराज मिरीकर यांच्या आशीर्वादाने कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच परिसरातील अनेक संत, महंत, भाविक व मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संत नागेबाबा संस्थानचे शिवाजीराव तागड यांनी दिली.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनसेवेने होईल. त्यानंतर चरित्र ग्रंथाचे प्रकाशन, संतांच्या विचारांचे मार्गदर्शन आणि उपस्थित मान्यवरांची मनोगते होणार आहेत. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत नागेबाबांच्या विचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.