Ticker

6/recent/ticker-posts

मांडव्यात स्वातंत्र्यदिनाचा अनोखा उत्सव



 वेशभूषा अन् रांगोळी स्पर्धेत बक्षिसांची लयलूट

 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

   दिग्रस : स्वातंत्र्यदिनाचा उत्साह केवळ ध्वजारोहण व प्रभातफेरीपुरता मर्यादित न ठेवता देशभक्ती, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचा जागर करण्यासाठी दिग्रस तालुक्यातील मांडवा येथे यंदा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत मांडवा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय संस्था, दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी गावपातळीवर भव्य वेशभूषा आणि कलात्मक रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

    या उपक्रमातून विद्यार्थ्यांसह महिला, पुरुष आणि ग्रामस्थांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळणार असून स्पर्धेसाठी रोख बक्षिसांची मोठी पर्वणी ठेवण्यात आली आहे. वेशभूषा स्पर्धा १५ ऑगस्ट रोजी प्रभातफेरीदरम्यान होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्यासह कोणत्याही महापुरुषाची किंवा थोर नेत्याची वेशभूषा स्पर्धकांना करता येणार आहे. वेशभूषा साकारताना संबंधित व्यक्तिमत्त्वाची ओळख व कार्य थोडक्यात सांगणे आवश्यक राहणार आहे. वेशभूषा, सादरीकरण, संवाद, आत्मविश्वास, कल्पकता आणि विषयाची मांडणी या निकषांवर परीक्षकांकडून गुणांकन केले जाणार आहे. वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी १,१११ रुपये, द्वितीय १,००१ रुपये, तृतीय ९०१ रुपये तसेच ८०१, ७०१, ६०१, ५०१, ४०१, ३०१, २०१ व १५१ रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

    रांगोळी स्पर्धेतही गावातील कोणत्याही वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. प्रभातफेरीच्या मार्गावरच रांगोळी साकारावी लागणार असून संबंधित ठिकाणी स्पर्धकाने आपले नाव नमूद करणे आवश्यक आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी १,१११ रुपये, द्वितीय १,००१ रुपये, तृतीय ९०० रुपये तसेच पुढील क्रमांकांसाठी ८००, ७००, ६००, ५००, ४००, ३००, २०१ आणि १५१ रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. रांगोळी स्पर्धेतील बक्षिसांचे वितरण ध्वजारोहणानंतर लगेच करण्यात येणार आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असून स्पर्धकांनी वेळेचे व शिस्तीचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यदिनाच्या माध्यमातून नव्या पिढीला महापुरुषांच्या विचारांची ओळख व्हावी, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि गावात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

   स्वातंत्र्यदिनाचा उत्सव केवळ औपचारिक न ठेवता तो संस्कार, संस्कृती आणि देशभक्तीशी जोडण्याचा मांडवा ग्रामपंचायत व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय संस्थेचा हा उपक्रम ठरणार असून, विद्यार्थी, महिला, पुरुष व सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.