Ticker

6/recent/ticker-posts

सहकार क्षेत्रातील सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी सहकार भारती प्रयत्नशील – संजयजी पाचपोर



कैलास कोल्हे, जालना

जालना : सहकार क्षेत्रातील विविध प्रश्नांचे निराकरण करून पतसंस्था व विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार भारती निश्चितच प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री संजयजी पाचपोर यांनी दिली.

जालना शहरात कार्यक्रमानिमित्त आले असता महालक्ष्मी पतसंस्थेत सहकार भारती जालना यांच्या वतीने महालक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष दादाराव तुपकर यांच्या हस्ते संजयजी पाचपोर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित संवाद सभेत सहकार क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची संजयजी पाचपोर यांनी समाधानकारक उत्तरे देत विविध समस्यांवर मार्गदर्शन केले.

सहकार क्षेत्रात होत असलेल्या विकासाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यात पतसंस्थांचे बँकेत रूपांतर होण्यासाठी तसेच पतसंस्था व विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार भारती प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या चर्चासत्रात सहकार भारतीचे राज्य सहसंघटनमंत्री विजय देशमुख, जिल्हा सहसंघटनमंत्री डॉ. विठ्ठल पवार, उपाध्यक्ष अॅड. दशरथ इंगळे तसेच गृहनिर्माण सोसायटी जिल्हा विभाग प्रकोष्ठ प्रमुख सुनील जोशी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहकार भारती सहविभाग प्रमुख भगवान जायभाये यांनी केले. प्रास्ताविक सहकार भारती पॅक्स प्रकोष्ठ सहप्रमुख भगवान मापारे यांनी केले, तर आभार जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना जाफ्राबादकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा महामंत्री ज्ञानेश्वर काळे, पॅक्स जिल्हा प्रकोष्ठ प्रमुख रामप्रभू परदेशी, भास्कर कोल्हे आदींनी परिश्रम घेतले.