Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस पाटील दिलवरसिंग वळवी यांना जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित

 


देवचंद पाडवी , ग्रामीण प्रतिनिधी सुरवाणी 

महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात कात्री (ता. धडगांव) येथील पोलीस पाटील दिलवरसिंग वळवी यांना जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महसूल विभाग व ग्रामप्रशासनाच्या समन्वयातून उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या पोलीस पाटीलांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलीस पाटील म्हणून गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गावातील तंटे व वाद सामंजस्याने सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे तसेच सामाजिक सलोखा व शांतता टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. गावातील विविध शासकीय उपक्रम, जनजागृती मोहिमा, नैसर्गिक आपत्ती अथवा आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी समन्वय साधून नागरिकांना मदत करणे तसेच गावकऱ्यांच्या अडचणी वेळोवेळी संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्यामुळे कात्री गावात प्रशासनाविषयी विश्वास निर्माण होण्यास मदत झाली असून ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांनाही गती मिळाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कात्री गावासह धडगांव तालुक्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संस्था व संघटनांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामुळे परिसरातील इतर पोलीस पाटीलांनाही अधिक उत्साहाने व निष्ठेने लोकसेवा करण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.