Ticker

6/recent/ticker-posts

साकळी येथील अंजुमन उर्दू विद्यालय देशभक्तीच्या वातावरणात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा



साकळी, ता. यावल | प्रतिनिधी – आरिफ खान | दि. १५ ऑगस्ट २०२६

साकळी येथील अंजुमन-ए-इस्लाम उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये देशभक्तीच्या उत्साहपूर्ण वातावरणात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. सकाळी ७ वाजता सर्व शिक्षक व विद्यार्थी शाळेच्या परिसरात उपस्थित झाले. क्रीडा शिक्षक युसूफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची परेड घेण्यात आली. त्यानंतर प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.

सर सय्यद एज्युकेशन सोसायटी, साकळीचे सदस्य अय्यूब खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हाजी सत्तार खान, उपाध्यक्ष सय्यद अहमद व इस्माईल खान, चेअरमन हाजी निसार खान, सचिव के. बी. खान ,संस्थाचे सर्व सभासद तसेच मुख्याध्यापक मोहम्मद फारूक यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. देशभक्तीपर गीते, भाषणे तसेच स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांचे योगदान आणि स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करणारे कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थिनींनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे नाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

यावर्षी विद्यालयातील ९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांना मुख्य अतिथी व मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

इयत्ता ५ वी :

१. तहमा नाज अब्दुल वहाब

२. आयशा बरकत सय्यद इकबाल

३. निदा फातिमा नासिर खान

४. जवेरिया बी. अब्दुल रऊफ कासार

५. आसिया फातिमा मोहम्मद रईस पिंजरी

६. अनिका हुमा शेख अल्ताफ

७. मुसब याहिया मोहसिन अख्तर शेख

इयत्ता ७ वी :

१. हन्नान खान नासिर खान

इयत्ता ८ वी :

१. अझरा जावेद खान

या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सत्कार समारंभानंतर संस्थेचे चेअरमन हाजी निसार खान यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगून शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. तसेच इतर विद्यार्थ्यांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अभ्यासात प्रगती करावी, असे आवाहन केले.

मुख्याध्यापक मोहम्मद फारूक यांनी आपल्या भाषणात देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि कठोर परिश्रम यांना जीवनाचा आधार बनवून भविष्यात पुढे जाण्याचा संकल्प करावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी सत्तार खान यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, स्वातंत्र्यदिन हा केवळ स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून आपल्या कर्तव्यांची जाणीव करून घेण्याचा आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. आपल्या स्वातंत्र्याचे सदैव रक्षण करून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साजिद बेग व मोहम्मद असलम यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार मोहम्मद असलम यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक मोहम्मद फारूक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.