अर्धापूर प्रतिनिधी | प्रा. एस. सावंत
लिटल किंग्ज इंग्लिश स्कुल व मुक्ताई विद्यालयात ‘सर्पविज्ञान समजुन घेताना’उपक्रम, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष साप हाताळत करून घेतली विषारी-बिनविषारी सापांची ओळख.“साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. सापांविषयी समाजात असलेली भीती आणि गैरसमज दुर करून त्यांच्याकडे पर्यावरणातील महत्त्वाचा घटक म्हणुन पाहिले जाण्याची गरज आहे,”असे प्रतिपादन सर्पमित्र साई चिट्टेवार यांनी केले.
वसमत येथील लिटल किंग्ज इंग्लिश स्कुल आणि मुक्ताई विद्यालय येथे विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सर्पविज्ञान समजुन घेताना…’ या विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन खास नागपंचमी सनानिमित्त करण्यात आले होते.यावेळी सर्पमित्र साई चिट्टेवार यांनी विविध प्रकारच्या सापांविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह माहिती दिली.यावेळी सर्पमित्र साई महादेव चिट्टेवार यांच्या सोबत सर्पमित्र शिवा कोंडीबा हातागळे आणि गजानन पांचाळ यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात विषारी आणि बिनविषारी साप कसे ओळखावेत, सापांचे निसर्गातील महत्त्व, सापांचे अन्न, अधिवास, त्यांचे वर्तन तसेच सर्पदंश झाल्यास कोणती काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. साप दिसल्यानंतर घाबरून त्याला मारण्याऐवजी प्रशिक्षित सर्पमित्राशी संपर्क साधावा आणि सुरक्षित अंतर राखावे, असा संदेशही यावेळी देण्यात आला.
शेतीतील उंदीर व इतर पिकांचे नुकसान करणाऱ्या जीवांवर साप नैसर्गिकरीत्या नियंत्रण ठेवतात. त्यामुळे शेतीच्या अन्नसाखळीत सापांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असुन ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे मित्र आहेत,असे चिट्टेवार यांनी विद्यार्थ्यांना समजावुन सांगितले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांना सापांचे जवळुन निरीक्षण करण्याची संधी मिळाली.तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष साप हाताळण्याचा अनुभव घेतला.त्यामुळे सुरुवातीला सापांविषयी असलेली भीती कमी होत विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला.विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून विषारी व बिनविषारी सापांविषयी माहिती जाणुन घेतली.
“साप दिसला म्हणजे मारायचा” ही मानसिकता बदलुन“साप समजुन घ्यायचा आणि त्याचे संरक्षण करायचे” हा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे आवश्यक आहे, असा संदेश या उपक्रमातुन देण्यात आला.
पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना निसर्ग,पर्यावरण आणि जैवविविधतेचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे,वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि अंधश्रद्धा व गैरसमज दुर व्हावेत,या उद्देशाने शाळेत अशा अनुभवाधारित उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असल्याचे शाळेच्या वतीने संचालक प्रा. नामदेव दळवी सर यांनी सांगितले.
या अभिनव उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ‘सापांविषयी भीती नव्हे, माहिती आणि जागरूकता हवी’ हा महत्त्वपुर्ण संदेश घेऊन हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.





Social Plugin