प्रोसिडिंग बुक न लिहिताच पदाधिकारी निघून गेल्याचा नागरिकांचा आरोप, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार
मुन्ना येरेकार ग्रामीण प्रतिनिधी
ग्रामपंचायत मुरधोनी येथे १७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत जनहिताच्या मुद्द्यांवरून मोठा वाद निर्माण झाला. नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्या आणि ठराव प्रोसिडिंग बुकमध्ये नोंदवून न घेताच सभा अर्धवट सोडून पदाधिकारी निघून गेल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, या प्रकरणी गटविकास अधिकारी (BDO) वणी यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
*नेमके प्रकरण काय?*
ग्रामपंचायत मुरधोनी अंतर्गत १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये नागरिकांच्या वतीने मुन्ना येरेकर, संदीप उत्तमराव भोयर यांच्यासह ग्रामस्थांनी गावातील विविध समस्या व विकासकामांसंदर्भात १० ते १२ महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करून त्यावर ठराव घेण्याची मागणी केली. मात्र, सभेचे कामकाज सुरू असताना घरकुलांच्याL यादीवरून बराच वेळ चर्चा झाली.
नागरिकांचा आरोप आहे की, सभेचे अध्यक्षस्थान भूषविणारे उपसरपंच साईनाथ तोडासे यांनी जनहिताचे हे मुद्दे प्रोसिडिंग बुकमध्ये नोंदवून घेण्यास नकार दिला व सभा अर्धवट सोडून निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ ग्रामपंचायत सचिव मॅडम देखील प्रोसिडिंग बुक सोबत घेऊन निघून गेल्या. सभा तहकूब झाली की काय, याबाबत ग्रामस्थांना कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.
*वरिष्ठांकडे कठोर कारवाईची मागणी*
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पंचायत समिती वणी येथील बीडीओ, यवतमाळचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि ठाणेदार वणी पोलीस स्टेशन यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली आहे. ग्रामस्थांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या आणि सभेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या जबाबदार पदाधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संदीप भोयर, मुन्ना येरेकर, अमोल खाडे, प्रवीण फलके, मुरलीधर भोयर यांच्यासह उपस्थित नागरिकांनी केली आहे.





Social Plugin