वाशिम प्रतिनिधी ओंकार पुरी
स्थानिक उत्तमचंद बगडीया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राज्यशास्त्र विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून, तर भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी अत्यंत उत्साहात आणि आदरपूर्वक साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रमोदकुमार नंदेश्वर हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विनोद कुलकर्णी व वरिष्ठ प्रा. संजय टिकार व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते म्हणून प्रा. धांडे यांनी उपस्थितांना संबोधित केले, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक प्रा. सुमित लाव्हरे यांनी मार्गदर्शक म्हणून आपले विचार मांडले.
प्रतिमा पूजन व मनोगत: कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने व माल्यार्पणाने झाली. यानंतर कु. वैष्णवी घोडे व कु. मेघा इंगळे या विद्यार्थिनींनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान आणि लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढा व वृत्तपत्र क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्य यावर प्रकाश टाकला.
प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन: प्रमुख व्याख्याते प्रा. धांडे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील वास्तववादी चित्रण, सामाजिक बांधिलकी आणि त्यांच्या लेखनातून मिळणारी प्रेरणा यावर सविस्तर भाष्य केले. मार्गदर्शक प्रा. सुमित लाव्हरे यांनी आपल्या भाषणात दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श अंगीकारावा, असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. प्रमोदकुमार नंदेश्वर यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून असलेले महत्त्व विशद केले.
"अण्णा भाऊंच्या साहित्याने व टिळकांच्या विचारांनी समाजाला नवी दिशा दिली. विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लेखनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी असे उपक्रम अत्यंत मार्गदर्शक ठरतात," असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप जुनघरे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले, तर आभार प्रा. डॉ. मंगल खेडेकर यांनी मानले.
या प्रसंगी प्रा.डॉ. अजाबराव वानखेडे, प्रा. डॉ. किरण बुधवंत, डॉ. जयंत मेश्राम, डॉ. मनोज नरवाडे, डॉ. कोमल काळे, प्रा. डॉ. अरविंद मनवर, प्रा. दशरथ प्रजापती,श्री. ओंकार पुरी, प्रा. विनोद राऊत, प्रा.पूजा पाठक, प्रा. राम जुनघरे, प्रा. निलेश बाजड, प्रा.अमरदीप साबळे,प्रा. बोंडे मॅडम, प्रा. विठ्ठल वाघ, श्री. संतोष घुगे, श्री. गोपाल कोल्हे यांच्यासह मोठ्या संख्येने प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
आयोजनाच्या यशस्वीतेसाठी श्री. सुनील चरहाटे, महेश पांडे, गजानन जाधव आणि श्री. बिल्लारी यांनी विशेष परिश्रम घेतले.





Social Plugin