परभणी, (प्रतिनिधी) शिवशंकर तुपकर
दि. 14-08-2026: जिंतूर येथील गरोदर माता मृत्यूप्रकरणी परभणी जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नागेश लखमावार यांचे निलंबन करण्यात आल्याच्या निषेधार्थ जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (१४ ऑगस्ट) सकाळी ८ वाजल्यापासून काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवेवर काही काळ परिणाम झाला.
डॉ. नागेश लखमावार यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ कर्मचारी व डॉक्टरांनी आक्रमक भूमिका घेत काम बंद आंदोलन पुकारले. आंदोलन सुरू झाल्यानंतर शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन आंदोलनकर्त्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या मागण्या समजून घेत संबंधित मंत्री महोदयांशी चर्चा करून डॉ. लखमावार यांचे निलंबन रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले.
या आश्वासनानंतर सुमारे चार तासांनी कर्मचाऱ्यांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले. मात्र, निलंबनाचा निर्णय मागे न घेतल्यास बुधवार (१९ ऑगस्ट) पासून जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचारी संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आंदोलनादरम्यान अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक व कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक कदम यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्तही जिल्हा रुग्णालय परिसरात तैनात करण्यात आला होता.
डॉ. लखमावार यांच्यावर जिंतूर येथील गरोदर माता मृत्यूप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या निलंबनामुळे रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून, प्रशासनाने निलंबनाचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले असले तरी निलंबन रद्द करण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास १९ ऑगस्टपासून पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
.jpg)




Social Plugin