Ticker

6/recent/ticker-posts

प्रामाणिकपणाचा आदर्श! परळी आगाराच्या चालक-वाहकांनी महिलेचे गंठण व रोख रक्कम सुखरूप परत केली



सोनपेठ प्रतिनिधी ( शिवशंकर तुपकर )दि. 06/08/2026 : 

प्रामाणिकपणाचे दर्शन घडविणारी एक कौतुकास्पद घटना सोनपेठ बसस्थानकावर घडली. सोनपेठ नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचारी जयश्री तात्याराव शिंदे या परळी ते सोनपेठ प्रवासादरम्यान आपला रुमाल बसमध्येच विसरून उतरल्या. त्या रुमालामध्ये सोन्याचे गंठण व २,५०० रुपये रोख रक्कम होती.

सोनपेठ बसस्थानकावर उतरल्यावर बस परत परळीकडे रवाना झाल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर राजमाता जिजाऊ बसस्थानकावर आलेल्या दुसऱ्या बसच्या वाहकास त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. संबंधित वाहकाने तत्काळ परळी आगाराच्या बसचे चालक एम. जी. मुंडे (क्र. १९६३२) व वाहक व्ही. आर. पल्लेवाड (क्र. ३२१३) यांच्याशी संपर्क साधला.

चालक व वाहक यांनी बसमध्ये शोध घेत रुमाल सुरक्षित हस्तगत केला. त्यानंतर दुसऱ्या फेरीनंतर सकाळी सुमारे ९.४५ वाजता सोनपेठ बसस्थानकावर आल्यानंतर त्यांनी सोन्याचे गंठण व रोख रक्कम जयश्री शिंदे यांच्याकडे सुखरूप सुपूर्द केली.

यावेळी वाहतूक नियंत्रक बी. एन. यादव, पोलीस शिपाई संतोष भुसनर, पत्रकार गजानन चिकणे तसेच साप्ताहिक सोनपेठ दर्शनचे संपादक किरण स्वामी उपस्थित होते.

हरवलेली मौल्यवान वस्तू प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल परळी आगाराचे चालक एम. जी. मुंडे व वाहक व्ही. आर. पल्लेवाड यांच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या या आदर्शवत कृतीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच हरवलेली मौल्यवान वस्तू सुखरूप परत मिळाल्याने जयश्री तात्याराव शिंदे यांनी चालक-वाहकांसह एस.टी. प्रशासनाचे आभार व्यक्त केले.