Ticker

6/recent/ticker-posts

रेवलकरवाडी ते विसापूर रस्ते कामातील गैरव्यवहाराची चौकशी करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलन



बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या विसापूर ते रेवलकरवाडी (ता. खटाव, जि. सातारा) रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरिदास अर्जुन जगदाळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ग्रामीण रस्ते विकास संस्था सातारामार्फत २०१४ मध्ये या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली असून, १६ मे २०२६ ही काम पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत:

 * काँक्रीटीकरणाचा अभाव व तडे: सिमेंट काँक्रीटीकरण करताना त्यावर पाणी (क्यूरिंग) न मारल्यामुळे रस्ता ठिकठिकाणी फुटला असून त्याला मोठे तडे गेले आहेत.

 * अपूर्ण कामे व पुलांचा अभाव: रस्त्यामध्ये समाविष्ट असलेले नवीन पूल अजूनही उभारण्यात आले नाहीत. तसेच सुमारे १.५ किमी लांबीचे काँक्रीटीकरण अद्याप अपूर्णच आहे.

 * निकृष्ट साईड पट्ट्या: रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्यांचे काम योग्य पद्धतीने करण्यात आलेले नाही; त्याऐवजी मातीचा भराव टाकण्यात आला आहे.

हे काम 'शिवसमर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स' (मौजे तळमावले, ता. पाटण) यांच्यामार्फत सुरू आहे. या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी गुणवत्ता नियंत्रण विभाग, मुख्य अभियंता, उपअभियंता व इतर कर्मचाऱ्यांची आहे. मात्र, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून नियम धाब्यावर बसवले गेले आहेत, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

या सर्व गैरप्रकाराची तात्काळ आणि योग्य चौकशी करून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिनी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.