बुध दि [प्रकाश राजेघाटगे]
कोरेगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रियदर्शनी स्कूल, कोरेगावचा होतकरू विद्यार्थी तनिष्क प्रशांत शिवशरण याने आपल्या अचूक बुद्धी आणि कौशल्याच्या बळावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या घवघवीत यशाने कोरेगाव तालुक्यासह ऐतिहासिक वर्धनगड परिसराचा मान उंचावला असून, सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कठीण प्रतिस्पर्ध्यांना मात देत तनिष्कने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. बुद्धिबळातील डावपेच, संयम आणि मानसिक तंदुरुस्तीच्या जोरावर त्याने अंतिम फेरीत विजय मिळवला. त्याच्या या यशामागे त्याचे खेळावरील सातत्य आणि शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
हा ऐतिहासिक वर्धनगड परिसराचा सुपुत्र असल्यामुळे या विजयाने गावाला एक वेगळाच अभिमान प्राप्त करून दिला आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्येही बुद्धिबळासारख्या बौद्धिक खेळात अव्वल कामगिरी करण्याची क्षमता असते, हे तनिष्कने सिद्ध करून दाखवले आहे.
या यशाबद्दल तनिष्कचे शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग, पालक तसेच वर्धनगड आणि कोरेगाव परिसरातील ग्रामस्थ, विविध मान्यवरांकडून अभिनंदन केले जात असून त्याच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.





Social Plugin